10 सप्टेंबरला दिल्लीत बैठक : वर्षअखेरीस प्रक्रियेला प्रारंभ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
निवडणूक आयोग देशभरात विशेष सघन सुधारणा (एसआयआर) म्हणजेच मतदारयादी पडताळणी करण्याची तयारी करत आहे. याबाबत 10 सप्टेंबर रोजी दिल्लीत एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला सर्व राज्यांचे मुख्य निवडणूक अधिकारी उपस्थित राहतील. यामध्ये देशभरात ‘एसआयआर’ करण्याच्या रणनीतीवर चर्चा केली जाईल. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी फेब्रुवारीमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर ही तिसरी व्यापक बैठक असेल.
निवडणूक आयोगाच्या मते मतदारयादी अपडेट करणे आणि परदेशी नागरिक, मृत व्यक्ती किंवा स्थलांतरित झालेल्या बेकायदेशीर मतदारांना काढून टाकणे हा ‘एसआयआर’मागील मुख्य उद्देश आहे. या सर्वेक्षणापूर्वी अनेक राज्यांमध्ये बांगलादेश आणि म्यानमारमधील स्थलांतरितांवर कारवाई सुरू आहे.
बिहारनंतर मतदारयादी पडताळणीची प्रक्रिया देशभरात राबविण्यात येईल, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. ही प्रक्रिया चालू वर्षअखेरीस सुरू होईल. या सर्वेक्षणानंतर 2026 मध्ये होणाऱ्या आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी मतदारयादी अपडेट करता येईल. मतदारयाद्यांमध्ये पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न सध्या निवडणूक आयोगाकडून सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून ‘एसआयआर’ प्रक्रिया राबविली जाणार आहे.









