काँग्रेस नेते राहुल गांधींचा आरोप : संबंधित निवृत्त झाले तरीही कारवाई करू
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला. मतांची चोरी होत असून आमच्याकडे याचे ठोस पुरावे आहेत. या मतांच्या चोरीत निवडणूक आयोग सामील आहे. यासंबंधीचे पुरावे आम्ही उघड केल्यास निवडणूक आयोग मतांची चोरी करत असल्याचे आणि कुणासाठी करत आहे हे पूर्ण देशाला कळणार आहे. आयोग भाजपसाठी हे कृत्य करत असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
आम्हाला मध्यप्रदेशात संशय आला होता, लोकसभा निवडणुकीबद्दलही संशय होता, महाराष्ट्रात आमच्या संशयाला बळ मिळाले. राज्यपातळीवर मतांची चोरी झाल्याचे आम्हाला जाणवले. एक कोटी अतिरिक्त मतदार जोडले गेले होते, मग आम्ही याच्या तपशीलात शिरलो, निवडणूक आयोगाने आम्हाला मदत केली नाही. आम्ही स्वत:हुन तपास करविला, याकरता 6 महिन्यांचा कालावधी लागला आहे. परंतु जे काही आमच्या हाती लागले आहे तो अॅटम बॉम्ब आहे. हा फुटल्यास भारतात निवडणूक आयोग कुठेच दिसणार नसल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
संबंधित लोक हे कृत्य निवडणूक आयोगात बसून करत आहेत. यात सामील लोकांना आम्ही सोडणार नाही. कारण हे लोक हिंदुस्थानच्या विरोधात काम करत आहेत. हा देशद्रोह आहे. संबंधित अधिकारी निवृत्त झाले तरीही त्यांना आम्ही शोधून काढणार आहोत. कर्नाटकात याचा खुलासा करणार आहोत असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केला आहे.
राहुल गांधींचे आरोप आधारहीन : आयोग
निवडणूक आयोगाने राहुल गांधींचे हे आरोप आधारहीन ठरवत ते फेटाळले आहेत. अशाप्रकारच्या बेजबाबदार गोष्टींकडे आम्ही प्रतिदिन दुर्लक्ष करतो असे म्हणत आयोगाने सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने काम करण्या सांगितले आहे.









