देवरुख :
तुटून पडलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने वृद्धेचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी 6 वाजता संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जाधववाडी येथे घडली. ह्रदया शांताराम मोरे (70) असे मृत महिलेचे नाव आहे. आजीला वाचवण्यासाठी गेलेला नातू ओम प्रकाश मोरे हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रातच महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला.
मोरे यांच्या घर परिसरात विद्युत तार तुटून पडली होती. ही विद्युत तार प्रवाहित होती. ह्रदया मोरे या गुरुवारी सकाळी घराबाहेर आल्या असता अचानक तुटून पडलेल्या विद्युत तारेला त्यांचा स्पर्श झाला. यावेळी आजीचा आरडाओरडा ऐकून नातू ओम तत्काळ बाहेर आला. हा प्रकार पाहून तो भांबावून गेला. आजीला वाचविण्यासाठी त्याने एक पाऊल पुढे टाकले. मात्र ओम मोरे यालाही विजेचा धक्का बसून तो जखमी झाला. या घटनेने मोरे कुटुंबीय हादरून गेले. ही बातमी साखरपा गावात पसरली. तुटलेल्या विद्युत तारेसंदर्भात महावितरणला सूचित करण्यात आले. यानंतर महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तत्काळ वीज पुरवठा बंद केला.
विजेच्या धक्क्याने जखमी झालेल्या ह्रदया मोरे व ओम मोरे यांना प्रकाश मोरे व गणेश मोरे यांनी तत्काळ साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. यावेळी वैद्यकीय सूत्रांनी तपासणी करून ह्रदया मोरे यांना मृत घोषित केले. ओम मोरे याला उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच मोरे यांचे नातेवाईक, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते यांनी साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. साखरपा परिसरात विविध ठिकाणी झाडाच्या फांद्या विद्युत तारांना घासत आहेत. या फांद्या तोडण्यात याव्यात, अशी मागणी वारंवार ग्रामस्थांमधून होत होती. याकडे महावितरण अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप येथील ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.
ह्रदया मोरे यांच्या मृत्यूनंतर संतप्त मोरे परिवार व ग्रामस्थांनी साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रातच महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती केली. ह्रदया मोरे यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळावी, जबाबदार अधिकारी–कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी तसेच मोरे कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी मिळावी, अशी मागणी जमावाने महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे केली. या घटनेची माहिती मिळताच आमदार किरण सामंत यांनी तहसीलदार, महावितरण विभागाचे अभियंता, पोलीस विभागाला घटनेबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले. मृत व्यक्तींना नुकसान भरपाई मिळावी व जखमी ओम मोरेला तातडीची मदत मिळावी, यासाठी महावितरणला आदेश दिले. अचानक घडलेल्या घटनेमुळे मोरे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ह्रदया मोरे यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, एक मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
- ह्रदया मोरे आज जाणार होत्या चेन्नईला
ह्रदया मोरे यांचे सुपुत्र प्रकाश मोरे व दत्ताराम मोरे हे कामानिमित्त चेन्नई तर संजय मोरे हे मुंबईला असतात. ह्रदया मोरेही अधूनमधून चेन्नईला मुलांकडे जातात. गुरूवारी ह्रदया मुलगा प्रकाश व नातू ओमसमवेत चेन्नईला जाण्यासाठी रवाना होणार होत्या. यामुळे सकाळी त्यांची धावपळ सुरू होती. मात्र चेन्नईला जाण्यापूर्वी ह्रदया मोरे यांच्यावर काळाने झडप घातली.
- धोकादायक वीज खांब तत्काळ बदला
साखरपा परिसरात काही वीज खांब धोकादायक स्थितीत आहेत. हे खांब बदलण्यात यावेत, वाढलेली झाडे तोडण्यात यावी, अशी मागणी वारंवार ग्रामस्थांमधून होत आहे. मात्र याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत आहे. धोकादायक खांब तत्काळ बदलणे गरजेचे असल्याचे मत साखरप्याच्या सरपंच रूचिता जाधव यांनी व्यक्त केले.








