अध्याय सविसावा
उद्धवा! ‘निर्मम’ आणि ‘निरभिमानी’ असणे हेच संतांचे निजगुह्य आहे. हेच संतांचे पाचवे व सहावे लक्षण होय. जे खरोखरच निर्मम व निरहंकार असतात, त्यांना द्वंद्वदु:खाचे डोंगर अणुमात्र बाधत नाहीत. गतजन्मी केलेल्या पाप पुण्याच्या कृत्यानुसार या जन्मी सुख दु:ख वाट्याला येतं. त्यालाच प्रारब्ध असं म्हणतात. ह्या प्रारब्धाच्या घटना देहापुरत्याच मर्यादित असतात. म्हणजे गरीब, श्रीमंत, आजारी, निरोगी इत्यादि अवस्था ह्या देहाच्या वाट्याला येतात परंतु ज्याने देह म्हणजे मी नव्हे हे लक्षात घेतलेले आहे तो त्याच्या सद्गुरूंच्या शिकवणुकीनुसार देहाच्या अवस्थेकडे साक्षी भावाने पाहील व स्वत: ईश्वर स्मरणात निमग्न राहील. असे होत असताना काही कारणाने त्याच्या देहाला होत असलेल्या असह्य वेदना सहन करण्याची शक्ती त्याला ईश्वर देतो. काहीवेळा ईश्वर किंवा सद्गुरू त्या वेदना स्वत: सोसतात. भक्ताची सर्व जबाबदारी माझ्यावरच असते. म्हणून जो माझ्यावर विसंबून असतो. त्याने देह प्रारब्धाच्या वाट्याला देऊन सोडल्यानंतर सुखदु:खांच्या झळा लागल्या तरी, तो ब्रह्मसुखाच्या चव्हाठ्यावर देहाचा द्रष्टा-साक्षी होऊन राहतो. त्याला भेदाचे भान राहत नाही. त्याला सर्व सजीव ईश्वररूप वाटत असतात. त्यामुळे हा आपला तो परका असा विचार त्याच्या मनात कधीच येत नाही. हे ‘निर्द्वंद्व असणे’ म्हणजे भेदभाव न करणे हा मुक्ताचा सातवा गुण होय. जो निर्द्वंद्व व निरभिमानी असतो, त्याला आपला देहच मुळी मिथ्या वाटतो. जरी त्याचा देह त्याला दिसत असला तरी तो स्वत: ईश्वररूप असल्याने देहाकडे तो तटस्थतेने पाहू शकतो. त्यामुळे देह असला काय आणि नसला काय त्याला काहीच फरक पडत नाही. देही असून विदेही अवस्थेत तो वावरत असतो. असं असल्यामुळे देहाशी नाते संबंध वाढवणाऱ्या परिवाराची त्याला गरज वाटत नसते. त्यामुळे आप्तइष्ट, धनसंपत्ती, बायकामुले यांच्याबरोबर राहूनसुद्धा तो त्यांच्यापासून अलिप्त असतो. समोर दिसणारा संसार खरा नाही याची त्यांना खात्री वाटत असते. सहाजिकच समोर दिसणारे नातेवाईक, शेतीवाडी हे सगळे त्यांना क्षणिक वाटत असतात. ज्याप्रमाणे स्वप्नातले व्यवहार जागेपणी शून्यवत होतात, त्याप्रमाणेच साधूंनाही संसार शून्यवत वाटत असतो. गीतेतही मी सांगितलंच आहे की, सर्वसामान्य लोकांवर अज्ञानाचा जबरदस्त पगडा असतो त्यामुळे त्यांना समोर दिसणारा संसार खरं वाटत असल्याने, त्यांना संसारात अत्यंत स्वारस्य वाटत असते पण ज्ञानी योग्यांना वस्तुस्थितीची जाणीव असल्याने ते या सर्वापासून अलिप्त असतात. त्यामुळेच जेव्हा इतर लोक जागे असतात, त्यावेळी ज्ञानी योग्यांच्या दृष्टीने ती रात्र असते. इतर मंडळी संसार मोहात जेव्हा आकंठ बुडालेली असल्याने बेसावध असतात तेव्हा योगी संसाराच्याबाबतीत त्यातले असारत्व जाणून असल्याने सदैव सावध असतो. सहाजिकच धनधान्य, शेतीवाडी, पैसा अडका, मित्र नातेवाईक इत्यादि कशातही त्यांना गोडी नसते म्हणून ते पूर्णपणे ‘अपरिग्रही’ असतात. हे त्यांचे आठवे मुख्य लक्षण होय. त्यांचे अपरिग्रही असणे जगाला अगदी अतक्मर्य असते. प्रारब्धानुसार काही साधूंची राहणी विलासी असते पण तो केवळ नाईलाजाने त्यांनी स्वीकारलेला देखावा असतो. उदाहरणार्थ जनक महाराज स्वत: देही असून विदेही वृत्तीचे होते. त्यांचे राज्य खूप मोठे होते. सम्राट असल्याने राहणी विलासी होती. ते पाहून अष्टावक्र मुनींनी त्यांना विचारले की, राजा तू स्वत: विरक्त आहेस, अपरिग्रही आहेस असे म्हणतोस मग सिंहासनावर का बसला आहेस? सोन्याच्या ताटात जेवतो आहेस, एव्हढा मोठा राणीवसा बाळगला आहेस. ह्या सर्व उपभोगाच्या गोष्टी कशासाठी गोळा केल्या आहेस? त्यावर जनक महाराज म्हणाले, मुनिवर प्रारब्धानुसार मी राजघराण्यात जन्माला आल्याने एक कर्तव्य म्हणून मला हा पसारा सांभाळावा लागतोय पण प्रत्यक्षात मला या कशातच स्वारस्य नाही.
क्रमश:








