बुधवारच्या सत्रात सेन्सेक्स 161 अंकांनी तर निफ्टी 58 अंकांनी प्रभावीत होत बंद
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवड्यातील बुधवारच्या सत्रात भारतीय भांडवली बाजारातील मागील आठ दिवसांच्या तेजीचा प्रवास अखेर थांबला आहे. यामध्ये जागतिक पातळीवरील घडामोडींचा परिणाम हा देशातील शेअर बाजारांवर झाल्याचे दिसून आले आहे. यामध्ये प्रामुख्याने अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदरांमध्ये बदल करण्याचा निर्णयाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. यामुळे भारतीय बाजारातील बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक हे घसरणीसह बंद झाले आहेत.
गेल्या आठ दिवसांपासून बाजारात कायम ठेवलेली बीएसई सेन्सेक्समधील तेजी दिवसअखेर 161.41 अंकांनी घसरुन निर्देशांक 61,193.30 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 57.80 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 18,089.85 वर बंद झाला आहे.
प्रमुख घडामोडींमध्ये बुधवारी ईडीने छापेमारी केल्यामुळे मणप्पुरम फायनान्सचे समभाग हे 12 टक्क्यांनी घसरुन बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये अदानी एंटरप्राईजेसचे समभाग 4 टक्के नुकसानीत राहिले आहेत. वधारण्यामध्ये रेल विकास गिगम , इंजिनिअर्स इंडिया आणि सिएट लिमिटेडचे समभाग यांनी आपली जागा निश्चित केली आहे.
जागतिक घडामोडींचा प्रभाव
अमेरिकन फेडरल रिझर्व्ह हे व्याजदरांमध्ये बदल करणार असल्याचे संकेत असून यामुळे देशातील बाजारात सुस्ती राहिल्याचे दिसून आले. यामध्ये 30 समभागांपैकी सेन्सेक्सचे 21 समभाग हे नुकसानीत राहिले आहेत. तर फक्त 9 समभाग हे हलक्या तेजीसह बंद झाले आहेत. जोरदार नुकसानीत असलेल्या कंपन्यांमध्ये मणप्पुरम फायनान्स 12.14 टक्क्यांनी घसरुन बंद झाला आहे. यासह अन्य कंपन्यांची स्थिती काहीशी तशीच रहिली होती. भारती एअरटेल 1.54 टक्के, टेक महिंद्रा 1.46, तर अॅक्सिस बँक 1.26, बजाज फायनान्स 1.22, लार्सन अॅण्ड टुब्रो 1.16 टक्के, टीसीएस 1.16 आणि सनफार्माचे समभाग हे 1.02 टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत.









