पावसाळ्यात मोठे भगदाड पडण्याची शक्यता, तातडीने दुरुस्तीची शेतकऱ्यांची मागणी, बांधाचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप
तिसवाडी : गेल्या वर्षी पाच कोटी खर्च करून नवीन बांधलेल्या करमळी येथील कुवळकातोर शेतीच्या बांधाची नदीच्या बाजूची कडा दोनकडे नुकतीच कोसळली आहे. याची तातडीने दुरुस्ती न केल्यास ऐन पावसाळ्यात मोठे भगदाड पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी बांधाच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी केली आहे. बांधाला भगदाड पडल्यास झुवारी नदीचे खारे पाणी करमळी गावातील कुवळकातोर, धाडो शेतीच्या बाजूला कोपे, पाटयार येथील घरांनी, शेतीत घुसेल. त्यामुळे घरांचेही मोठे नुकसान होईल. तसेच धाडो,कुवळकातोर येथील शेतीचे बांध कोसळतील व परिसरातील बागायतीसुध्दा नष्ट होतील. सध्या कुवळकातोर शेतीच्या बांधाची बाजू कोसळली आहे. बांधाची माती पाण्याने वाहूनही गेली आहे. हा प्रकार बांधावरून येणाऱ्या ट्रकांमुळे घडला आहे.
दरम्यान, कंत्राटदाराने बांधावर फक्त माती टाकून जाग बुजवली आहे. मात्र नदीच्या बाजूची कडा दगडाने व काँक्रीटने बांधलेली नाही. त्यामुळे आता ऐन पावसाळ्यात त्या ठिकाणची माती पावसाच्या व नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून जाईल. तसेच बांधाला दोन मोठी भगदाडे पडतील. हा प्रकार टाळण्यासाठी नदीच्या बांधाची बाजू दगडाने व काँक्रीटने बांधली पाहिजे व मध्यभागी मातीचा भराव टाकून बांधाची व्यवस्थित दुरुस्ती केली पाहिजे. हे काम संबंधित कंत्राटदाराचे आहे व शेती समितीच्या सदस्यांचे तसेच कृषी खात्याचे व कार्यकारी अभियंत्यांचे आहे. सदर बांध पाच कोटी खर्च करून आधुनिक पध्दतीने बांधलेला आहे. त्या बांधाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने हा प्रकार घडलेला आहे. आणखीन बांधाला या पुढे भगदाड पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली आहे. कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी या प्रकरणात लक्ष घालावे अशीही मागणी केली आहे.