मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली
भारताची अर्थव्यवस्था वर्ष 2026 ते 2027 पर्यंत 5,000 अब्ज डॉलर्सची होणार असून 2033 ते 34 या कालावधीत भारतीय अर्थव्यवस्था 10,000 अब्ज डॉलर्सचा टप्पा गाठू शकेल असे प्रतिपादन मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांनी केले आहे. ते यूएनडीपी इंडियाकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.
आमची अर्थव्यवस्था आता 3,300 अब्ज डॉलर्सची आहे आणि 5,000 अब्ज डॉलर्सचे ध्येय प्राप्त करण्यासाठी काहीच अडचण राहणार नाही. मात्र आपण फक्त या आकडेवारीवरच स्थिर राहून उपयोग नाही. अर्थव्यवस्थेत 10 टक्क्यांची काहीशी वृद्धी राहणार असल्याचा अंदाज आहे. वर्ष 2033-34 पर्यंत हा आकडा 10,000 अब्ज डॉलर्सचा होणार असल्याचेही नागेश्वरन यांनी स्पष्ट केले आहे.
जागतिक बँकेने यामध्ये चालू आर्थिक वर्षासाठी भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धीचा अंदाज घटवून 7.5 टक्के केला आहे. तर चलनवाढ, पुरवठा साखळीमधील विस्कळीतपणा, राजकीय संकट आदी कारणांमुळे सदरच्या अंदाजात हा बदल करण्यात आल्याचेही त्यांनी या दरम्यान नमूद केले आहे.








