स्व. रवी नाईकांचा शासकीय दुखवटा संपण्याची उसंत, नरकासुर वधाच्या आनंदाने कहरच केला. या आनंदाने नेत्याच्या दुखवट्यावरही मात केली. सामाजिक भान अन् मनाची चाड असती तर धिंगाणा तरी बंद झाला असता. दिवाळीपूर्व नरकासुर वधाचा आता कार्निव्हल होऊ लागलेला आहे. नरकासुराचा अध्याय आता संपला. रामा काणकोणकरवरील हल्लाही पोलीस तपासापुरताच राहिलेला आहे. या ना त्या कारणाने गोव्याची शांतता हरवत चालली आहे, हे खरे. कायदा आणि सुव्यवस्था शांतताप्रिय गोमंतकीयांसमोर आव्हान बनत आहे. गोव्याला जणू नरकासुरांचेच ग्रहण लागलेले आहे. गोव्याची प्रशासकीय यंत्रणा त्यांच्यासमोर हतबल ठरलेली आहे.
गोवा मुक्तीनंतरच्या 65 वर्षात मोजकेच काही नेते लोकनेता म्हणून ओळखले गेले. पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्यासारखा लोकनेता पुन्हा झालाच नाही. विरोधी पक्षनेते डॉ. जॅक सिकेरा यांनीही जनतेची मने जिंकली होती. त्यानंतरच्या काळात अॅड. रमाकांत खलप लोकप्रियतेवर आरूढ झाले होते. डॉ. विल्फ्रेड डिसोजा आणि रवी नाईक यांना लोकनेता म्हणूनच पाहिले गेले. रवी नाईक यांनीच ज्यांना ‘रासुका’ लावून तुरुंगात पाठविले होते, त्या चर्चिल आलेमाव यांनाही एकेकाळी गोव्यातील जनतेने त्यांचे अवगुण नजरेआड करून लोकनेताच मानले होते, हे सत्यही नाकारता येणार नाही. बहुजन समाजामध्ये रवी नाईक यांनी सर्वोच्च स्थान कमावले यात शंकाच नाही. रवी नाईकांवर भंडारी समाजाचा शिक्का होता परंतु ते त्या पलीकडचे नेते होते. 79 वर्षांचे रवी नाईक कुणाच्या ध्यानी-मनी नसताना अंतर्धान पावले. त्याचमुळे त्यांचे निधन चटका लावून गेले. कुळ-मुंडकारांना न्याय देण्यासाठो त्यांनी चालविलेली चळवळ, राजभाषा आंदोलन काळात त्यांनी दाखविलेले धैर्य, मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी दिलेले योगदान, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून दाखविलेला कणखरपणा, या आठवणींना उजाळा मिळाला.
उतारवयात रवी नाईक शरीराने थकले होते परंतु बहुजन समाजाचे नेते म्हणून आजही त्यांच्याच नावाला वजन होते. विद्यमान राजकीय पटलावर नजर फिरविल्यास त्यांची जागा घेऊ शकणारा कुणीही नेता सध्या दिसत नाही. दिवाळी उंबरठ्यावर आलेली असतानाच रवींच्या निधनाची बातमी आली आणि दिवाळीच्या आनंदात खडा पडला. परंतु ज्यांना रवी नाईक म्हणजे ‘चाय पिया, सामोसा खाया’ एवढेच माहीत आहे, अशा वर्गाला अनंत उल्हासात नरकासुर नाचविण्याचा आनंद आवरता आला नाही. गोवाभर नरकासुराच्या नावाने पहाटेपर्यंतच नव्हे तर अगदी सकाळपर्यंत नंगानाच झाला. बिचाऱ्या श्रीकृष्णांनाही नरकासुराच्या वधाची सकाळपर्यंत वाट पाहावी लागली. बिभत्स संगीताच्या तालावर तरुणाई मद्यधुंद होऊन धिंगाण्यात रमली. जणूकाही हा हिंदूंचा कार्निव्हल आणि हा दिवाळीपूर्व कार्निव्हल सरकारच्याच उघड पाठिंब्याने सर्वत्र साजरा झाला, असे खेदाने म्हणावे लागते. एवढे स्वातंत्र्य त्या रात्री गोवाभर सर्वच नरकासुरांना सरकारने बहाल केले होते.
गोव्याला आता उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचेही निर्णय गांभिर्याने घ्यावेसे वाटत नाही, असेच त्या रात्री दिसले. प्रथा-परंपरेला दोष हा द्यायचा की, सरकार आणि त्यांच्या प्रशासकीय यंत्रणेच्या नाकर्तेपणाला द्यायचा, याचा विचार मंत्री सुदिन ढवळीकर यांनी करायला हवा. ती प्रथाच बंद करा म्हणून कुठल्याच मंत्र्याला हात झटकता येणार नाही. अनिष्ट प्रकार शिमगोत्सवातही घडतात. गणेश चतुर्थीच्या काळातही घडतात, अन्य प्रथा आणि उत्सवांच्या काळातही घडतात म्हणून काय त्या प्रथाच बंद कराव्यात? नरकचतुर्दशीच्या मार्गानेच दिव्यांच्या आळीकडे जावे लागते, हे लक्षात असावे. खासदार सदानंद तानावडे तर नरकासुरांना ‘एसओपी’ सूचवितात. कसली ‘एसओपी!’, त्यापेक्षा आहे त्याच कायद्यांचे आणि नियमांचे पालन करा, कर्तव्याशी प्रामाणिक राहा, सारे काही सुरळीतपणे होईल. दंगे होणार नाहीत, बिभत्स प्रकार होणार नाहीत, पोलिसांच्या अंगावर कुणी धावणार नाही आणि पोलीस स्थानकासमोरच कार पेटविण्याचा प्रयत्नही कुणी करणार नाही. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे, हे सरकारच्या गृहखात्याचे अपयश आहे. नाकर्तेपणामुळे गोव्यात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ लागलेला आहे. याचा विचार होणे गरजेचे आहे.
गोव्याला नरकासुरांचेच ग्रहण लागलेले आहे. देव कमी आणि नरकासुर जास्त दिसू लागलेत. देव कोण आणि नरकासुर कोण, हे ठरविण्यापेक्षा जनताही नरकासुरांनाच शरण जाऊ लागली आहे, हे अधिक घातक आहे. काहींना वाटतेय नरकासुरमुक्त दिवाळी असावी. ही त्यांची हतबलता झाली. त्यापेक्षा नरकासुरमुक्त राजकारणाची इच्छा बाळगायला हवी. राजकारणासाठी काहीही सहन करण्याची प्रथा योग्य नव्हे. ही वृत्ती न बदलल्यास गोव्याची शांतता हरवतच राहील. शांतता कायम राहण्यासाठी अनिष्ट प्रकार रोखण्याची कुवत पोलिस यंत्रणेत असायलाच हवी. अन्यथा पोलिसांची गरज ती काय? आज आपले पोलीसच राजकीय दबावाखाली निमूटपणे उभे असतात. त्यामुळे पोलिसांचा धाक कुणाला दिसत नाही. समाजविघातक घटक पोलिसांना गृहीत धरत आहेत. सामान्य म्हणून ओळखला जाणारा माणूसही पोलिसांच्या अंगावर हात घालण्यास धजावतो. हल्लीच्या काळात पोलिसांवरच हल्ले होण्याच्या अनेक घटना गोव्यात घडल्या. गुन्हेगारांना पोलीस आणि कायद्यांचे भय असते तर अनेक हल्ल्यांमध्ये सहभागी गुंड दिवसाढवळ्या भर रस्त्यावर रामा काणकोणकराच्या जीवावर उठले नसते. नरकासुर वधाच्या रात्री होंडा-सांखळीत पोलीस स्थानकासमोरच कुणी धिंगाणा घालून पोलिसांना जेरीस आणले नसते. पणजीत पोलिसांना अपमान सहन करावा लागला नसता. पोलीस स्थानकातच दोन गटांमध्ये ‘राडा’ होऊन हात-पाय तोडले गेले नसते.
छोट्याशा गोव्यात कायद्याचा धाक राहिलेला नाही, त्यामुळे शांतता हरवत चालली आहे. पोलिसांना किंमत नाही, ही लाजीरवाणी गोष्ट आहे. एकेकाळी स्व. रवी नाईक यांनी समाजविघातक शक्तींना वठणीवर आणले होते. त्यांच्या गृहखात्याने चर्चिल आलेमावसारख्या एकेकाळच्या बाहुबली नेत्याला जबरदस्त हिसका दाखविला होता. रूडॉल्फ फर्नांडिस यांना ‘प्रॉटेक्टटर्स’ गुंडाळावी लागली होती. एका तरुणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात मिकी पाशेकोंना रडणे भाग पडले होते. बाबूश मोन्सेरात आणि त्यांच्या समर्थकांनी पणजीच्या पोलीस स्थानकावर हल्ला चढविला आणि त्याच रात्री पोलीसही कायदा हातात घेऊ शकतात, बंगल्यात घुसून लाठ्यांनीच नव्हे तर लाथांनीही तुडवू शकतात, याचा पुरेपूर अनुभव मोन्सेरात कुटुंब आणि त्यांच्या समर्थकांनी घेतला होता. रवींच्या गृहखात्याचा तो हिसका होता. आज एखाद्या पोलीस स्थानकावर हल्ला झाला तर पोलिसांना ते धैर्य होणार नाही. गोव्यात खंडणीखोरी गुंडगिरी, दांडगाई वाढतच जाण्याची चिन्हे आहेत.
अनिलकुमार शिंदे








