सांगली :
यंदा मान्सूनने वेळेत हजेरी लावली. जूनपासून अपवाद वगळता सातत्याने पाऊस सुरू आहे. दुष्काळी भागासह काही मंडलामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही अतिवृष्टी झाल्याने कृष्णा, वारणा दुथडी भरून वाहू लागल्या. धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने यंदा पाण्याची भ्रांत मिटली आहे. परंतु अद्यापही दुष्काळी पट्ट्यातील जमिनीची तहान भागलेली नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील २४ तलाव अद्यापही कोरडे आहेत. यामध्ये साहजिकच जत तालुक्यातील कोरड्या तलावांची संख्या सर्वाधिक आहे.
मान्सूनची हजेरी वेळेवर लागल्याने आणि पावसाचे सातत्य यामुळे यंदा खरीप हंगामाच्या पेरण्यात चांगल्या झाल्या आहेत. सरासरी जिल्ल्याचा पेरा ८० टक्क्यांपेक्षा जास्त झाला असून पिकेही चांगली आहेत. परंतु दमदार पावसाअभावी एक दोन दिवस उन पडल्यास पिके दुपार धरू लागली आहेत. पावसाळ्यात नद्यांतील पाणी पूर्वभागात सोडून तलाव भरण्याची घोषणा नेहमीचीच झाली आहे. परंतु योजना सुरू ठेऊनही तलाव कोरडेच राहिल्याचे चित्र आहे.
जत तालुक्यातील दोड्डानाला मध्यम प्रकल्पात केवळ ३३ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. तर बसाप्पावाडी तलावात ९३ टक्के साठा आहे. याशिवाय बेळुंकी, बिरनाळ, डफळापूर, कोसारी, मिरवाड, पांडोझरी, रेवनाळ, शेगाव, तिपेहळ्ळी तलाव शंभर टक्के भरले आहेत.
तर सिध्दनाथ, तिकोंडी, उमराणी, अंकलगी, दरीबडची, गुगवाड, जालीहाळ, खोजनवाडी तलाव ऐन पावसाळयात कोरडे पडले आहेत. उर्वरित तलावामध्ये जेमतेम पाणीसाठे आहेत. पावसाळयानंतर या भागात पाणीबाणी निर्माण होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. आटपाडी तालुक्यातील तेरा लघु प्रकल्पापैकी दिघंची, गोरडवाडी, महाडिकवाडी, हे तीन प्रकल्प वगळता अन्य तलावांमध्ये ९० ते १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. कडेगाव तालुक्यातील चिंचणी अ’बक वगळता सातही तलाव भरले आहेत. पण कवठेमहांकाळ तालुक्यातील बंडगरवाडी हा एकच तलाव शंभर टक्के भरला आहे. तर रायवाडी, दुधेभावी, कुची तलावातील पाणीसाठा ९० टक्क्यांच्या पुढे असून उर्वरित तलावात जेमतेम पाणीसाठा आहे. खानापूर तालुक्यातील आठही तलाव टेंभू योजनेच्या पाण्याने भरले आहेत. मिरज, शिराळा, वाळवा तालुक्यातील तलावही भरले आहेत. परंतु जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील पावसाची आकडेवारी पहाता या तालुक्यांना म्हैसाळ, टेंभू योजनेच्या पाण्यावरच अवलंबून दिवस काढावे लागणार असे चित्र आहे.
धरणातील पाणीसाठ्यामुळे वर्षभरातील पाणी आवर्तनांची चिंता मिटली असली तरी भुगर्भातील पाणीपातळीत फारशी वाढ झाली नसल्याचे चित्र आहे. मे आणि जून माहिन्यात जिल्हयात चांगला पाऊस झाला. परंतु जुलै आणि ऑगस्टच्या दहा दिवसांत पूर्वभागात फारसा पाऊस झाला नाही. जुलै महिन्यात सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे आता पूर्वभागातील शेतीसाठी परतीच्या पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.








