पुणे / प्रतिनिधी :
पहाटेचा शपथविधी झाला नसता तर महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट उठली असती का? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी बुधवारी राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली.
चिंचवडध्ये आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. ते म्हणाले, 2019 साली नेमकं काय झालं? त्यावेळी सरकार बनवण्याचा एक प्रयत्न झाला. त्या प्रयत्नाचा एकच फायदा झाला की, राष्ट्रपती राजवट होती, ती उठली. राष्ट्रपती राजवट उठल्यानंतर काय झालं, हे तुम्ही पाहिलं असेल. पहाटेच्या शपथविधीबाबत तुम्हाला माहिती होती का? पहाटेच्या शपथविधीबाबत अजित पवारांनी बोलण्याची गरज नाही. राष्ट्रपती राजवट उठवण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. त्या अनुषंगाने केलेली एखादी खेळी असू शकते. अजित पवारांनी त्यावेळी जी विधाने केली त्याला फार महत्त्व आहे, असे मला वाटत नाही.
अधिक वाचा : कोश्यारींनी मोघम आरोप करू नयेत
पहाटेच्या शपथविधीबाबत आपल्याला माहिती होती का नव्हती, याबाबत कोणतेही थेट भाष्य न करता शरद पवार बरेच काही बोलून गेले. मात्र, शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात पहाटेच्या शपथविधीबाबत नव्याने चर्चा सुरु होण्याची शक्यता आहे. यावर भाजप आणि महाविकास आघाडीचे नेते काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.