बेनकनहळ्ळी येथील प्रकारामुळे संताप : माफी मागितल्याने प्रवाशी झाले शांत
बेळगाव : धामणे एस. गावावरून बेळगावकडे येणारी बस बेनकनहळ्ळी गावामध्ये चालकाने थांबविली नाही. बसमध्ये प्रवासी कमी असताना देखील ती बस थांबविली नसल्याने तरुणांनी त्या बसचा पाठलाग केला. यावेळी त्या तरुणांवर बस घालण्याचा प्रयत्न चालकाने केला. यामुळे संतप्त झालेल्या तरुणांनी बसच्या समोरच दुचाकी आडव्या लावून बस अडविली आणि चालकाला जाब विचारला. तालुक्यातील पश्चिम भागातील प्रवाशांना नेहमीच बसची समस्या भेडसावत आहे. बस पकडण्यासाठी साऱ्यांना धावपळ करावी लागत आहे. याचबरोबर बसची प्रतीक्षाही बराच उशीर करावी लागते. मंगळवारी धामणे एस. गावावरून बेळगावकडे बस येत होती. यावेळी बेनकनहळ्ळी बस थांब्यावर ती बस थांबविण्यासाठी प्रवाशांनी विनंती केली. मात्र चालकाने बस न थांबविताच पुढे नेली. बसमध्ये कमी प्रवाशी असतानाही बस थांबविली नाही. यामुळे चालकाला चांगलेच धारेवर धरण्यात आले. या घटनेमुळे काही वेळ या ठिकाणी तणाव निर्माण झाला. बसची दुचाकीला धडकही बसली होती. यामुळे चालकाला धारेवर धरण्यात आले. त्यानंतर यापुढे मी असा प्रकार करणार नाही म्हणून चालकाने विनंती केली व यापुढे बस थांब्यावर बस थांबवू, असे आश्वासन देऊन माफी मागितल्याने त्यावर पडदा पडला.









