करूळ येथील प्रकार
चोरट्यांकडून संमोहनाचा वापर करून रक्कम लंपास केल्याची चालकाची माहिती
घटनेची पोलिसांत नोंद
फोंडाघाट: संजय सावंत
गॅस सिलिंडर डिलिवरी गाडीच्या चालक, क्लिनर यांच्या ताब्यातील जवळपास ४० ते ५० हजार रुपये रक्कम अनोळखी चोरट्यांनी हातचलाखीने लंपास केली. चोरट्यांनी संमोहनाचा वापर करून सदरची रक्कम आपल्याकडून लंपास केल्याचे गॅस सिलिंडर गाडीवरील चालक, क्लिनरचे म्हणणे आहे. हा प्रकार करुळ येथील काच कारखाना थांब्यानजीक शनिवारी सायंकाळी ४.३० वा. सुमारास घडला. घटनेचे वृत्त वेगाने पसरल्यानंतर करूळसह फोंडाघाट परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान घटनेची कणकवली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
घटना अशी, चालक संतोष कदम व क्लिनर रुपेश खरात हे नेहमीप्रमाणे एमएच ०७ एजे १६८० या गाडीमधून गॅस सिलिंडर डिलिवरी करत होते. ते पावणादेवी, हरकुळ, कनेडी, कणकवली अशा रस्त्याने फोंडाघाटला येत होते. मार्गात करुळ येथील काच कारखाना थांब्यानजीक जांभेकर नामक एका ग्राहकाला सिलिंडर देण्यासाठी गाडी थांबली. याचवेळी फोंडाघाटच्या दिशेने जाणारी टोयाटो कंपनीची कार त्यांच्याजवळ येऊन थांबली. कारमधून उतरलेल्या एकाने संतोष, रुपेश यांच्याकडे सर्वप्रथम सिलिंडरची चौकशी केली. त्यानंतर एक काचसदृश वस्तू त्यांच्यासमोर धरली. परिणामी आपल्यावर संमोहनासारखा प्रकार झाल्याचे संतोष, रुपेश यांचे म्हणणे आहे. तर थोड्या वेळाने पाहणी केली असता संतोष, रुपेश यांच्याकडे असलेली जवळपास ४० ते ५० हजार रुपये रक्कम चोरीस गेली होती. सिलिंडर डिलिवरीमधून दिवसभरात जमा केलेली ही रक्कम होती. तर पैसे लंपास करणारे ते संशयित आपल्या कारमध्ये बसून कणकवलीच्या दिशेने निघून गेले.
दरम्यान आपल्याकडील रक्कम लंपास झाल्याचे लक्षात येताच संतोष, रुपेश यांनी १०० क्रमांकावरून पोलिसांशी संपर्क साधला. त्यानुसार पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते.









