वाहतूक खात्याचा ‘इंटेलिजन्ट’ कारभार
पणजी : पणजी शहर व सभोवताली मोठा गाजावाजा करून सुरू झालेल्या ई चलनाचा फज्जा उडवणारे एक प्रकरण समोर आले असून नियम मोडणाऱ्या वाहनचालकाऐवजी रस्त्यावर वाहन न आणलेल्या भलत्याच वाहनचालकास चलन देण्याचा पराक्रम वाहतूक पोलिसांनी केला आहे. गोवा विद्यापीठ रस्त्यावर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी करंजाळे येथील एका व्यक्तीला त्याच्या मोबाईलवर रु. 1000 दंडाचे ई चलन पाठवण्यात आले. त्याला ते चलन पाहून धक्काच बसला. कारण ज्या दिवशी नियम मोडले म्हणून चलन आले त्या दिवशी त्याने आपले वाहन बाहेरच काढले नव्हते. ते घरीच होते. परिणामी ती व्यक्ती गोंधळून गेली आणि तिला विनाकारण इकडे तिकडे धावाधाव व अटापिटा करण्याचा त्रास भोगावा लागला.
वाहन होते घरीच
ई चलनासोबत वाहनाचे फोटो पाठवण्यात आले तेव्हा ते वाहन आपले नसून भलत्याचेच असल्याचे त्या व्यक्तीच्या लक्षात आले. हा प्रकार ई चलन पाठवणाऱ्याच्या चुकीमुळे झाल्याचे वाहतूक खात्याच्या लक्षात आणून दिले. तशी तक्रार ऑनलाईन पद्धतीने वाहतूक खात्याच्या पोर्टलवर करण्यात आली तेव्हा तक्रारीची पोचपावती मिळाली. परंतु पुढे अजूनपर्यंत काहीच झालेले नाही. आपण वाहन त्या दिवशी बाहेर काढले नाही. विद्यापीठ रोडवर चालवले नाही. नियम मोडले नाहीत. त्यामुळे दंड भरणार नाही, असा दावा त्या व्यक्तीने केला आहे.
नियम मोडणारी कार दुसरीच
दरम्यान, ज्या कारने वाहतूक नियम मोडले त्या कारचा क्रमांक जीए 07 एम 5487 असा होता. परंतु चलन पाठवताना कारचा नंबर बदलून जीए 07 के 5487 असा करण्यात आला. म्हणजे एम च्या जागी के घालण्यात आल्याने ते चलन भलत्याच नावाने त्याच्या मोबाईलवर पाठवण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. यात चूक कोणाची ? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. वाहतूक पोलिसांचा कामचुकारपणा की ऑनलाईन तांत्रिक चूक ? असे अनेक सवाल उपस्थित झाले असून त्याची उत्तरे अजून मिळालेली नाहीत. परंतु विनाकारण एका व्यक्तीला त्रास झाल्याचे व वाहतूक खात्याचा बेजबाबदारपणा मात्र उघड झाला आहे.









