पुराभिलेख खात्याच्या संचालकांची विशेष अधिकारी म्हणून नेमणूक
प्रतिनिधी/ पणजी
तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राज्यात फिल्म सिटी व्हावी, असे स्वप्न बाळगले होते. आता हे स्वप्न सत्यात उतरण्याची चिन्हे आहेत. कारण सरकारने फिल्म सिटीसाठी गतिमान पावले उचली असून, या कामासाठी पुराभिलेख खात्याचे संचालक रोहित कदम यांची विशेष अधिकारी म्हणून सरकारने नेमणूक केली आहे, अशी माहिती समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.
गोवा विद्यापीठात एका कार्यक्रमानंतर बोलताना मंत्री फळदेसाई म्हणाले, गोव्यात फिल्म सिटी व्हावी, यासाठी दिवंगत मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री असताना प्रयत्न सुरू होते. फिल्म सिटी झाल्यास राज्यातील सुमारे पाच हजार कलाकारांच्या त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याबरोबरच रोजगाराचीही संधी प्राप्त होणार आहे. त्यामुळे गोव्यात फिल्म सिटी होणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.
फिल्म सिटी व्हावी, यासाठी सरकारने पावले उचलल्यानंतर फिल्म सिटीच्या जागेसाठी प्रस्ताव मागितला होता. त्याला अनुसरून काणकोण तालुक्यातील भगवती पठार येथील जागेचा प्रस्ताव सरकारकडे आला आहे. सुमारे 10 लाख चौरस मीटर इतकी ही जागा आहे. या जागेवर फिल्म सिटी होणे सोयीस्कर ठरेल. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याबाबतची जबाबदारी माझ्याकडे दिली होती. त्यामुळे आता पावले गतिमान उचलण्यात आली आहेत. गोवा मनोरंजन संस्थेमार्फत फिल्म सिटीचे काम पाहिले जाणार असल्याचेही ते म्हणाले.
कलाकारांना योग्य व्यासपीठ मिळावे, यासाठी राज्यात फिल्म सिटी होणे गरजेचे आहे. असे झाल्यास राज्यातील कलाकारांना इतर राज्यात जावे लागणार नाही. गोवा ही कलाकारांची भूमी आहे. परंतु त्यांना साधन-सुविधा हव्या त्या प्रमाणात मिळत नसल्याने महाराष्ट्रातील मुंबईसारख्या ठिकाणी जावे लागते. गोव्यात फिल्म सिटी झाल्यास राज्यातील कलाकारांना व्यासपीठतर मिळेल. शिवाय अंदाजे पाच हजार कलाकारांना रोजगाराच्या स्वऊपात मदतही होईल, असे मंत्री फळदेसाई म्हणाले.









