प्रतिनिधी/ बेळगाव
गोगटे चौकातील उद्यानाची दूरवस्था झाली असून, या उद्यानाचा विकास करण्याचा प्रस्ताव कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीत मंजूर करण्यात आला होता. सदर उद्यानाचा विकास करण्याची तयारी आमदारांनी दर्शविली होती. मात्र, सातत्याने पाठपुरावा करूनदेखील कॅन्टोन्मेंट बोर्ड व संरक्षण खात्याने उद्यानाचा विकास करण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे उद्यानाचा विकास रखडला असून आमदारांचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे.
गोगटे चौकाशेजारी असलेल्या जागेत उद्यान निर्मिती करण्यात आली होती. त्यामुळे मध्यवर्ती असलेल्या उद्यानात अनेक नागरिक आणि शाळकरी मुले येत असत. मात्र, कित्येक वर्षांपासून उद्यानाच्या विकासाकडे कॅन्टोन्मेंट बोर्डचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे सदर उद्यानात झाडेझुडपे वाढली असून, या ठिकाणी कचराकुंडी बनली आहे. काही भटके नागरिक या ठिकाणी वास्तव्य करीत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. प्लास्टिक बाटल्यांचा कचरा या ठिकाणी ठेवला जात असल्याने उद्यानाला कचरा डेपोचे स्वरुप आले आहे. त्यामुळे या उद्यानाचा विकास करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती.
गोगटे चौकाशेजारी असलेल्या उद्यानाच्या विकासाबाबत कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीत चर्चा करण्यात आली होती. या उद्यानाचा विकास करण्याची तयारी आमदारांनी दर्शविली होती. काम सुरू करण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डने परवानगी द्यावी, असे पत्रदेखील दिले होते. त्यानुसार तत्कालिन कॅन्टोन्मेंट अध्यक्ष आणि अधिकाऱ्यांसमवेत या उद्यानाची पाहणी करण्यात आली होती. मात्र, आजपर्यंत उद्यानाच्या विकासाचा मुद्दा मार्गी लागला नाही. सदर उद्यान कॅन्टोन्मेंटच्या अखत्यारित येत नसल्याचे सांगून परवानगी देण्याबाबत जबाबदारी झटकली आहे. त्यामुळे संरक्षण खात्याकडे परवानगीची विचारणा केली होती. मात्र, संरक्षण खात्यानेदेखील उद्यानाच्या विकासासाठी मंजुरी दिली नाही. त्यामुळे उद्यानाचा विकास रखडला आहे. उद्यानाच्या विकासाचे स्वप्न उत्तरच्या आमदारांनी पाहिले होते. पण आमदारांचा कार्य कालावधी संपत आला तरी उद्यानाच्या विकासासाठी परवानगी मिळाली नसल्याने विकास करण्याचे स्वप्न अधुरे राहिले आहे.









