शहरवासियांना शुद्ध पाण्याची प्रतीक्षा : 9 पैकी 6 जलपुंभांचे काम पूर्ण
बेळगाव : शहरात 24 तास पाणीपुरवठ्याचे स्वप्न कित्येक दिवसांपासून अधुरेच राहिले आहे. शहरातील 58 वॉर्डातील केवळ 10 वॉर्डांमध्ये 24 तास पाणीपुरवठा होत आहे. मात्र उर्वरित वॉर्डातील नागरिकांना अद्याप 24 तास पाण्याची प्रतीक्षाच लागली आहे. 2025 पर्यंत शहराला 24 तास पाणीपुरवठा होईल, असे आश्वासन एलअँडटीने दिले होते. मात्र अद्याप या प्रकल्पाची अंमलबजावणी झालेली दिसत नाही. त्यामुळे 24 तास शुद्ध पाणीपुरवठ्याऐवजी दररोज सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी सर्वसामान्य शहरवासियांतून होऊ लागली आहे. शहरात 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी 2006 मध्ये ही योजना राबविण्यात आली. प्रत्यक्षात 2012 मध्ये या योजनेच्या कामाला प्रारंभ झाला. सद्यस्थितीत शहराला 108 दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. मात्र सद्यस्थितीत केवळ 10 वॉर्डामध्ये अखंड पाणीपुरवठा योजना सुरू आहे. शहरात सर्वत्र 24 तास पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे मनपा एलअँडटी आणि लोकप्रतिनिधींकडून सांगितले जात आहे. मात्र अद्याप 24 तास पाण्याचे स्वप्नच राहिले आहे.
पाणीपुरवठ्याची जबाबदारी एलअँडटी कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. कंपनीने मनपा क्षेत्रातील 58 वॉर्डांमध्ये 32 झोन केले आहेत. यापैकी 6 झोनमध्ये 24 तास पाणीपुरवठ्याचे काम पूर्ण झाले आहे. शहरातील 945 किलोमीटर जलवाहिनीपैकी आतापर्यंत 200 कि.मी. जलवाहिनी घालण्यात आली आहे. सद्यस्थितीत मुत्यानट्टी, महावीरनगर, आरसीनगर परिसरात 24 तास पाणीपुरवठा होत आहे. जुलै 2026 पर्यंत सर्व प्रभागांमध्ये 24 तास पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट एलअँडटीने ठेवले आहे.
या योजनेंतर्गत बहुतांशी प्रभागामध्ये पाण्याचे नळ आणि मीटर बसविण्याचे काम पूर्णत्वाकडे आल्याचे अधिकारी सांगत असले तरी प्रत्यक्षात अद्याप बहुतांश भागात नळ आणि मीटर जोडणीचे काम शिल्लक असल्याचे दिसत आहे. शहराला 24 तास पाणीपुरवठ्यासाठी 9 ठिकाणी जलकुंभ उभारले जात आहेत. त्यापैकी 6 जलकुंभांचे काम पूर्ण झाले आहे. वडगाव, मृत्यूंजयनगर, उद्यमबाग, कलमेश्वरनगर, देवराज अर्स कॉलनी, कणबर्गी, कावेरीनगर, गणेशपूर या ठिकाणी हे जलकुंभ उभारले जात आहेत. शहराचा विस्तार वाढू लागला आहे. त्यानुसार शहरात जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्याचबरोबर अंदाजे 25 लाख लिटर क्षमतेचे 16 जलकुंभ उभारले जात आहेत. सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी पंपिंग स्टेशनचे दुरुस्ती कामही करण्यात आले आहे, अशी माहिती एलअँडटीने दिली आहे.
6 झोनमध्ये जलदगतीने काम पूर्ण
एलअँडटी कंपनीकडे पाणीपुरवठ्याची जबाबदारी आल्यानंतर शहरात 32 झोनमध्ये काम हाती घेण्यात आले आहे. यापैकी 6 झोनमध्ये जलदगतीने काम पूर्ण करून पाणी पुरवठा करण्यासाठी पाऊले उचलण्यात येणार आहे.
रवीकुमार (एलअँडटी कंपनी व्यवस्थापक)









