कित्येक महिने करतात तयारी बोदी समुदायातील अजब प्रकार
जगभरात स्लीम बॉडीचे चाहते असले तरीही इथियोपियातील बोदी समुदायात लठ्ठ व्यक्तीला ‘हीरो’ मानले जाते. इथियोपियाच्या ओमी खोऱयातील एका दुर्गम कोपऱयात राहणाऱया बोदी समुदायामध्ये अनेक अनोख्या मान्यता आहेत. येथे लोक ‘सर्वात जाड व्यक्ती’चा मान मिळविण्यासाठी गायीचे दूध अन् रक्त पित असतात. 6 महिन्यांपर्यंत चालणाऱया स्पर्धेनंतर पुरुषांमध्ये सर्वात लठ्ठ व्यक्तीला विजेता म्हणून निवडले जाते. या विजेत्या व्यक्तीला जीवनभरासाठी ‘हीरो’ मानले जाते. हा समुदाय उपजीविकेसाठी पूर्णपणे पशूपालनावर अलवंबून आहे. बोदी पुरुष हे स्वतःच्या कंबरेच्या चहुबाजूला कापसाची पट्टी बांधतात.
सर्वात लठ्ठ व्यक्तीची स्पर्धा समारंभाच्या 6 महिन्यांपूर्वी सुरू होते. प्रत्येक कुटुंबातील एक अविवाहित पुरुष यात भाग घेऊ शकतो. स्पर्धेसाठी निवडले गेल्यावर संबंधित पुरुष 6 महिन्यांसाठी एका झोपडीत राहतो, जेथून त्याला बाहेर पडण्याची अनुमती नसते. आहाराच्या स्वरुपात हे लोक गायीचे रक्त अन् दूधाच्या मिश्रणाचे सेवन करतात. गावातील महिला नियमित स्वरुपात पुरुषांना हे मिश्रण पुरवत असतात.
बोदी समुदायासाठी गाय अत्यंत पवित्र प्राणी असल्याने त्यांची हत्या केली जात नाही. तर गायीच्या नस कापून त्यातून रक्त काढले जाते आणि नंतर मातीने ही जखम झाकली जाते. लठ्ठ व्यक्ती पूर्ण दिवस गायीचे दूध अन् रक्त पितात. काही लोक हे पिऊ शकत नाहीत आणि उलटी करू लागतात. स्पर्धेच्या दिवशी पुरुष स्वतःच्या झोपडीतून बाहेर पडण्यासाठी स्वतःच्या शरीराला माती अन् राखेने माखून घेतात.
लठ्ठपणाचे स्वप्न
6 महिन्यांपर्यंत स्पर्धेच्या तयारीत काही लोक इतके लठ्ठ होतात की त्यांना धड चालताही येत नाही. सर्वात लठ्ठ व्यक्तीच्या निवडीनंतर एका विशाल पवित्र दगडाने पशूबळी देण्यात येतो आणि त्यानंतर स्पर्धा संपुष्टात येते. समारंभानंतर पुरुष स्वतःचे सामान्य जीवन जगू लागतात आणि बहुतांश जणांच्या पोटाचा आकार काही आठवडय़ांनी कमी होतो. परंतु काही काळानंतर पुन्हा स्पर्धेची तयारी सुरू होते. बोदी समुदायात सर्वात लठ्ठ होण्याचे प्रत्येक मुलाचे स्वप्न असते. स्पर्धेच्या काही आठवडय़ांनी पोटाचा आकार मूळ पदावर आला तरीही संबंधित पुरुष जीवनभरासाठी हीरो ठरत असतो.









