वाहनधारकांना धोका, खुर्ची ठेवून घेतली खबरदारी
बेळगाव : अनगोळ-वडगाव संपर्क रस्त्याचा विकास करण्यात येत आहे. मात्र सदर काम कूर्मगतीने सुरू असल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. वळीव पावसाला सुरुवात झाली तरी रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. अशातच संत मीरा शाळेसमोरील ड्रेनेज चेंबर खचले असल्याने वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. तर त्यावर खुर्ची ठेवून नागरिकांनी खबरदारी घेतली आहे. अनगोळ-वडगाव संपर्क रस्त्याच्या विकासाचे काम सुरू करून वर्ष उलटले. पण अद्यापही पूर्ण झाले नाही. गटारी बांधण्याचे काम सुरू असून रस्त्यावर ठिकठिकाणी माती टाकण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. भाग्यनगर क्रॉस ते अनगोळपर्यंतच्या संत मीरा शाळेसमोरील रस्त्यावर जलवाहिन्या घालण्यासाठी खोदाई करण्यात आली होती. त्यानंतर या रस्त्याचेही काम रखडले आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी चरी पडल्या असून रस्त्याचे दुरुस्ती करणे गरजेचे आहे. पण सध्या महापालिका प्रशासनासह सर्वच यंत्रणा निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने विकासकामे पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. मात्र याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. तसेच संत मीरा शाळेजवळ ड्रेनेज चेंबरचे झाकण खराब झाले आहे. त्याठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले होते. मात्र शनिवारी विधानसभा निवडणुकीची मतमोजणी असल्याने बंदोबस्तासाठी सर्व बॅरिकेड्स आरपीडी कॉलेजकडे नेण्यात आले आहे. त्यामुळे संत मीरा शाळेसमोरील बॅरिकेड्स देखील हटविण्यात आले आहे. मात्र नागरिकांना चेंबरचा धोका असल्याने याठिकाणी खराब झालेली खुर्ची ठेवून खबरदारी घेण्यात आली आहे. वास्तविक पाहता चेंबरमध्ये अवजड वाहने अडकण्याचा धोका आहे. रात्रीच्यावेळी या ठिकाणी अपघात होऊ शकतो. त्यामुळे महापालिकेने याकडे लक्ष देऊन ड्रेनेज चेंबरची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.









