दुकान-घरांमध्ये शिरले पाणी : मोठे नुकसान : बसवन कुडचीत प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका
वार्ताहर /सांबरा
बसवन कुडची येथे प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका स्थानिक नागरिकांना बसला आहे. बुधवारी पहाटे शिवारातील दोन तलावांना जोडणाऱ्या नाल्याचा बांध फुटून मोठ्या प्रमाणावर पाणी गावात शिरले. मात्र बेळगाव-बागलकोट रस्ता करताना कंत्राटदाराने गटारीच न बांधल्याने पाण्याचा निचरा झाला नाही व अनेक घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाचे पाणी बेळगाव-बागलकोट महामार्गावरील अनेक दुकानांमध्ये व घरांमध्ये शिरले. त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे धान्य व इतर साहित्याचे भिजून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर केएलई संस्थेच्या संकल्प वेलनेस सेंटरमध्येही पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्याचबरोबर हॉटेल, गॅरेज व इतर दुकानांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे अधिकारी, माळमाऊती पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी व इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व जेसीबीच्या सहाय्याने चर खोदून पाण्याचा निचरा करण्यास प्रारंभ केला. महामार्गाशेजारी गटारी नसल्याने गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्याशेजारी पाणी साचून राहिले होते. मात्र बुधवारी पहाटे नाल्याचा बांध फुटून गावामध्ये आलेल्या पाण्यामुळे येथील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. अलीकडेच बेळगाव-बागलकोट महामार्गाचे ऊंदीकरण करण्यात आले आहे. वास्तविक ऊंदीकरण केल्यानंतर महामार्गा शेजारून गटारी बांधणे बंधनकारक होते. मात्र कंत्राटदाराने गटारी बांधल्या नाहीत व याकडे प्रशासनानेही डोळेझाक केली. त्यामुळे याचा फटका नागरिकांना बसला आहे. सायंकाळपर्यंत पाण्याचा निचरा करण्याचे काम सुरूच होते.
बसवेश्वर-कलमेश्वर मंदिर परिसराला तलावाचे स्वरूप
गावच्या दक्षिणेकडे दोन तलावांना जोडणारा एक नाला आहे. त्याच नाल्याचा बांध फुटल्याने नाल्यातील पाणी गावामध्ये शिरले व पाणी सर्वप्रथम गावात शिरल्यानंतर बसवाण्णा मंदिर परिसरात जमा झाले. त्यामुळे मंदिर परिसराला तलावाचे स्वरुप प्राप्त झाले होते.
मुतगे येथे वडाचे मोठे वृक्ष कोसळले
मंगळवारी मध्यरात्री एकच्या सुमारास बेळगाव-बागलकोट मार्गावरील मुतगे येथे वडाचे मोठे वृक्ष कोसळले. त्यामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. संबंधित अधिकाऱ्यांना वृक्ष कोसळल्याची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने दाखल होऊन वृक्ष बाजूला केले व रस्ता खुला केला. दिवसभरात या रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. वृक्ष रात्रीच्या वेळी कोसळल्याने सुदैवानेच मोठा अनर्थ टळला.









