मिरज-विजयनगर शेवटचा टप्पा निर्माणाधीन
प्रतिनिधी./ बेळगाव
रेल्वेची गती वाढविण्यासाठी रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण केले जात आहे. लेंढा-मिरज या टप्प्यातील दुपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. डिसेंबर अखेरपर्यंत दुपदरीकरणाचे काम पूर्ण करण्याची तयारी केली जात आहे. मिरजजवळील विजयनगर परिसरात रेल्वेमार्गाचे काम शेवटच्या टप्प्यात असून ते काम पूर्ण होताच दुपदरीकरणाचे काम पूर्ण होणार आहे.
एकच रेल्वेमार्ग असल्यामुळे एक्स्प्रेस व पॅसेंजर क्रॉसिंगसाठी थांबत होत्या. त्यामुळे प्रवासाचा कालावधी वाढत होता. त्यामुळे रेल्वे विभागाने महत्त्वाच्या रेल्वेमार्गांवर दुपदरीकरण करण्याचा निर्णय घेतला. मागील पाच ते सहा वर्षांपासून रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाचे काम सुरू आहे. पुणे-लोंढा या मार्गावरील मिरज-लोंढा हा टप्पा बेळगावच्या रेल्वेसेवेसाठी महत्त्वाचा होता. टप्प्याटप्प्याने दुपदरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले.
मिरज-लोंढा हा 186 किलोमीटरचा रेल्वेमार्ग आहे. 2019 पासून रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाला सुरुवात झाली. एकूण सात टप्प्यांमध्ये दुपदरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. पहिल्या टप्प्यात चिकोडी ते घटप्रभा या 16 किलोमीटर रेल्वेमार्गाचे काम पूर्ण झाले. माजी केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री कै. सुरेश अंगडी यांच्या हस्ते या रेल्वेमार्गाचे उद्घाटन झाले. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात चिकोडी-रायबाग व रायबाग-कुडची अशा 31 किलोमीटरच्या रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण झाले. त्यानंतर बेळगाव ते खानापूर व चौथ्या टप्प्यात खानापूर ते लोंढा रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण झाले.
त्यानंतर बेळगाव-सुलधाळ व सुलधाळ ते घटप्रभा या टप्प्यांचे दुपदरीकरण करण्यात आले. सध्या शेवटच्या टप्प्यात कुडची ते मिरज असे 33 किलोमीटरच्या रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण अंतिम टप्प्यात आहे. सध्या मिरज ते विजयनगर या दरम्यानच्या दुपदरीकरणाचे काम सुरू आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या पुलावर रेल्वेमार्ग घालण्यात आला असून येत्या पंधरा दिवसात हे काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.









