बेळगाव प्रतिनिधी : सुळेभावी (ता. बेळगाव) येथे गुरूवारी रात्री घडलेल्या दुहेरी खुनाने परीसर हादरला आहे. शिवपुतळय़ापासून हाकेच्या अंतरावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन त्याच गावातील दोन तरुणांचा भीषण खून करण्यात आला आहे. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली असून मारिहाळ पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. प्रकाश निंगाप्पा हुंकरी-पाटील (वय 24) रा. लक्ष्मी गल्ली, सुळेभावी, रणधीर उर्फ महेश रामचंद्र मुरारी (वय 26) रा. कलमेश्वरनगर, सुळेभावी अशी खून झालेल्या तरुणांची नावे आहेत. थोडय़ा अंतरावर प्रकाश व रणधीर यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळय़ात पडले होते.
घटनेची माहिती समजताच पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी, बेळगाव ग्रामीणचे एसीपी गिरीश, मारिहाळाचे पोलीस निरीक्षक महांतेश बस्सापूर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पाठलाग करुन धारदार शस्त्राने हल्ला केल्यामुळे प्रकाश व रणधीर यांचा जागेवरच मृत्यू झाला असून या घटनेनंतर गावात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. चार वर्षांपूर्वी सुळेभावी येथे झालेल्या एका खून प्रकरणात रणधीरला अटक झाली होती. सध्या तो जामीनावर आहे. गोकाक, बेळगाव येथील वेगवेगळय़ा पोलीस स्थानकात त्याच्यावर गुन्हे आहेत. रात्री उशीरापर्यंत त्याची पार्श्वभूमी तपासण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले होते. अलिकडे तो बेकरी चालवत होता, अशी माहिती मिळाली आहे. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे. रात्री उशीरापर्यंत प्रकाश व रणधीर यांचा खून कोणी केला? याचा तपास सुरू होता. खुनानंतर मारेकर्यांनी पलायन केले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. मारिहाळ पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Previous Articleशाळकरी मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न?
Next Article कंग्राळी बुद्रुकमध्ये दौडची उत्साहात सांगता









