वृत्तसंस्था / चेन्नई
मंगळवारी येथे झालेल्या पहिल्या बीएफआय चषक पुरूषांच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत सेनादलाच्या स्पर्धकांनी आपले निविर्वाद वर्चस्व राखले. सेनादलाच्या विश्वनाथ, हुसामुद्दीन, वंशज, सचिन आणि अंकुश यांनी विविध वजन गटात अजिंक्यपदे मिळविली. सेनादलाने या स्पर्धेत 7 सुवर्ण पदकांसह सर्वंकष जेतेपद पटकाविले. हरियाणा दुसऱ्या तर रेल्वे तिसऱ्या स्थानावर राहिला.
47 ते 50 किलो वजन गटातील झालेल्या अंतिम लढतीत सेनादलाचा एस. विश्वनाथने हरियाणाच्या आशिषचा 5-0 असा पराभव करत विजेतेपद पटकाविले. एस. विश्वनाथ हा 22 वर्षांखालील वयोगटातील आशिया स्पर्धेतील चॅम्पियन आहे. 50 ते 55 किलो वजन गटातील अंतिम लढतीत सेनादलाच्या आशिषने एआयपीच्या नवराजचा 3-2 असा पराभव करत विजेतेपद मिळविले. 55 ते 60 किलो वजन गटातील अंतिम लढतीत सेनादलाच्या मोहम्मद हुसामुद्दीनने साईच्या सागर जाखडचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला. 60 ते 65 किलो वजन गटातील अंतिम लढतीत सेनादलाच्या वंशजने प्रीत मलिकवर 3-2 अशा गुणांनी निसटता विजय मिळवित जेतेपद पटकाविले. 65 ते 70 किलो वजन गटातील अंतिम लढतीत साईच्या सुमित कुमारने सेनादलाच्या रजतचा 5-0 असा पराभव करत विजेतेपद मिळविले.
70 ते 75 किलो वजन गटातील अंतिम लढतीत सेनादलाच्या सचिनने हरियाणाच्या निरजचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला. 75 ते 80 किलो वजन गटातील अंतिम लढतीत सेनादलाच्या अंकुशने चंदीगडच्या अमनचे आव्हान 5-0 असे संपुष्टात आणले. 80 ते 85 किलो वजन गटात सेनलादच्या नवीन बोराने रेल्वेच्या विनीतचा 3-0, 85 ते 90 किलो गटात साईच्या दक्षने सेनादलाच्या विशाल गुप्ताचा 3-2 असा पराभव केला. 90 ते 90 किलो वरील सुपर हेवी वेटगटात चंदीगडच्या सावन गिलने साईच्या लक्ष राठीचा 3-2 असा पराभव केला. या स्पर्धेत महाराष्ट्राची महिला मुष्टीयुद्धी खुशी जाधवची महिलांच्या विभागात सर्वोत्तम म्हणून निवड करण्यात आली. तिने 54 किलो गटात प्रतिनिधीत्व केले होते.









