मिरज :
येथील शासकीय रुग्णालयातून चोरीस गेलेल्या बाळाचे त्याच्या आईसोबत डीएनए नमुने जुळले आहेत. पोलिसांनी शोधून काढलेले बाळ हे सविता आलदर यांचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तसा अहवाल न्यायालसामोर सादर केला आहे. चोरीचे बाळ आपलेच असल्याचा दावा करणाऱ्या संशयित सारा साठे हिचा खोटेपणा डीएनए चाचणीमुळे उघड झाला आहे.
मिरज शासकीय रुग्णालयाच्या महिला प्रसूती पश्चात विभागातून तीन दिवसाच्या नवजात अर्भकाची चोरी झाली होती. पोलिसांनी गतीमान तपास यंत्रणा राबवित तासगाव तालुक्यातील सावळज गावातून बाळाला व बाळ चोरणाऱ्या महिलेला शोधून काढले. याप्रकरणी सारा साठे संशयित महिलेस अटक करण्यात आली होती.
पोलिस तपासात संबंधीत संशयित महिलेने सदरचे बाळ आपलेच असल्याचा दावा केला होता. त्यामुळे चोरीस गेलेले बाळ, त्याची मुळ आणि संशयीत आरोपी महिला यांची डीएनए चाचणी करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार चाचणीचा अहवाल पुण्याच्या न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला होता. घटनेच्या एक महिन्यानंतर त्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे.
डीएन चाचणीच्या अहवालानुसार चोरीस गेलेल्या बाळाचे आणि त्याच्या आईचे म्हणजेच सोलापूर जिल्ह्यातील सविता आलदर या महिलेचेच नमुने जुळले आहेत. त्यानुसार पोलिसांनी डीएनए चाचणीसह तपासाचा अहवाल न्यायालयात सादर केला आहे. चोरीचे बाळ आपलेच असल्याचा दावा करणाऱ्या संशयित बाळ चोरट्या महिलेचा खोटारडेपणा उघड झाला आहे. बाळाची डीएनए चाचणी हाच या गुन्ह्यातील महत्त्वाचा पुरावा आहे.
- सिव्हीलकडून दोषी कर्मचाऱ्यांना अभय
मिरज शासकीय रुग्णालयातील नर्स परिचारीका आणि सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच बाळ चोरीची घटना घडल्याचा ठपका पाच सदस्यीच चौकशी समितीने ठेवला होता. संबंधीत कर्मचाऱ्यांवरील कारवाई संदर्भात वरिष्ठ विभागाकडे चौकशी अहवालासह कारवाईचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र, त्यावर वरिष्ठ विभागाकडून अद्याप निर्णय झाला नाही. परिचारीकांच्या संघटनांनी चौकशी समितीच्या अहवालाला विरोध केल्याने त्यांच्यावरील कारवाई बारळगली होती. मात्र तीन सुरक्षारक्षक कर्मचाऱ्यांना प्रमुख दोषी ठरविले असताना त्यांच्यावर तातडीने कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र, अद्यापपर्यंत कारवाई झाली नाही. सिव्हील प्रशासनाकडूनच या प्रकरणातील दोषी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाठिशी घातले असून त्यांना अभय मिळत असल्याची चर्चा आहे.








