गणेशोत्सव मिरवणुकीत मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी आवश्यक : पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी घेतले गांभीर्याने
मनीषा सुभेदार/बेळगाव
आठवडाभरात येऊ घातलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने काही मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत. त्याचबरोबर पोलीस आयुक्तांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णांचा विचार करून साऊंड सिस्टीम लावा, हे तत्त्व विशेष अधोरेखित केले आहे. दरवर्षी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेबाबत आवाहन करण्यात येते. परंतु त्याची अंमलबजावणी तितक्याच काटेकोरपणे होत नाही, हा इतिहास आहे. प्रशासनाने व पोलीस दलाने सातत्याने सांगूनसुद्धा डीजेचा कर्णकर्कश आवाज थांबत नाही, आणि पुढे त्यामुळे होणाऱ्या परिणामांची जबाबदारीही कोणी घेत नाही. यंदा तरी याची अंमलबजावणी कठोरपणे होईल अशी आशा दिसत आहे. कारण पोलीस आयुक्त भूषण बोरसे व जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी ही बाब गांभीर्याने घेतली आहे.
गणेशोत्सव हा सण श्रद्धेने, भक्तीने आणि तितक्याच उत्साहाने साजरा करण्याची बेळगावकरांची परंपरा आहे. येथील गणेश विसर्जन मिरवणूक ही तर सर्वत्र कौतुकाचा विषय ठरली आहे. मिरवणूक बघण्यासाठी पंचक्रोशीतून भाविक येत असतात. अर्थातच मिरवणूक मार्ग गर्दीने फुलून जातात. मात्र, डीजे लावून त्यावर थिरकणाऱ्या मंडळींमुळे मिरवणूक संथगतीने पुढे सरकते व त्याचा इतरांना त्रास होतो. मात्र, त्याची कल्पना मंडळांना नसते. ज्या ठिकाणी हॉस्पिटल्स, प्रामुख्याने चिल्ड्रन्स हॉस्पिटल, वृद्धाश्रम आहेत तेथून मिरवणूक जात असताना कोणत्याही प्रकारचा आवाज न करता पुढे जावे, असे कायदाही सांगतो. परंतु आजपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही. डीजेच्या मर्यादेपलीकडील आवाजामुळे ध्वनिप्रदूषण होतेच. परंतु रुग्ण आणि लहान मुलांना त्याचा फटका बसतो. डीजेचा आवाज वाढल्यास हृदयाचे ठोके वाढू शकतात. हृदयविकाराने त्रस्त रुग्णांना त्याचा त्रास होऊन अनर्थ ओढवू शकतो. कारण आवाजाचा परिणाम थेट हृदयावर होतो.
याशिवाय लहान मुलांच्या कानांनाही त्रास होतो. बालकांचे अवयव पुरेसे परिपक्व न झाल्याने त्यांच्या कानांचा पडदा फाटण्याची शक्यता ईएनटी तज्ञ वर्तवतात. त्यामुळे अशा परिसरातून जाताना डीजे न लावण्याबाबत मंडळांनी जितके गंभीर राहणे गरजेचे आहे, तितकेच प्रशासनाने नियमांचे पालन होईल, यावर भर देण्याची गरज आहे. प्रशासनाने नुकत्याच झालेल्या गणेश मंडळांच्या बैठकीमध्ये मिरवणूक मार्गांवर असणारी हॉस्पिटल्स आणि डीजेमुळे राज्यात झालेल्या अनुचित घटना याबद्दलचा तपशीलच जाहीर केला. प्रशासनाने दिलेल्या यादीमध्ये 65 हॉस्पिटलची यादी आहे. आजपर्यंत या मार्गांवरून मिरवणूक पुढे सरकत असताना कोणत्याही मंडळाने डीजे थांबवून वृद्धांच्या किंवा रुग्णांच्या तसेच बालकांच्या आरोग्याचा विचार केलेला नाही. याबद्दल डॉक्टरांमध्येसुद्धा नाराजी पसरली आहे. यापूर्वी आयएमएनेसुद्धा याबाबत प्रशासनाकडे निवेदनाद्वारे डीजेच्या मर्यादेबद्दल विनंती केली होती. परंतु कारवाई न झाल्याने डीजे सुरूच राहिले.
बेळगावमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीच्यादरम्यान काही दुर्घटना घडल्या आहेत. सदाशिवनगर येथे मूर्तीच्या उंचीमुळे विद्युततारा दूर करताना शॉक लागून चार जणांचा मृत्यू झाला होता. काही बालकांच्या कानांमध्ये श्रवणदोष निर्माण झाला होता. दणदणाटाने भिंत कोसळण्याची घटना घडली होती. बऱ्याच वेळेला तक्रार करूनही काही होत नाही, अशी नकारात्मक भावना जनतेमध्ये व प्रामुख्याने डॉक्टरांमध्ये पसरली आहे. शिवाय तक्रार केल्यास आपल्यालाच त्याचे परिणाम भोगावे लागतील की काय, अशी भीतीही आहे. त्यामुळे पोलीस आणि प्रशासनानेच कारवाई केल्यास डीजेमुळे होणाऱ्या दुर्घटना टाळता येतील. मंडळांच्या उत्साहाचे स्वागतच आहे. परंतु उत्सवाकडून आपण उन्मादाकडे जात नाही ना? याचे आत्मपरीक्षण करणेही गरजेचे आहे.
पारंपरिक वाद्यांचे स्वागत
गणेशोत्सव हा सर्वांनी एकत्रित येऊन करण्याचा उत्सव आहे. परंतु अलीकडच्या काळात उत्सवापेक्षा उन्मादाचेच प्रदर्शन तीव्रतेने आणि चुरशीने केले जाते. त्या मंडळापेक्षा माझ्या मंडळाच्या गणपतीची उंची किती मोठी आहे, माझ्या मंडळाच्या उत्सवाचा थाटमाट किती आहे, आमच्या मंडळाचा डीजे किती लाखाचा आहे, याची स्पर्धा करण्यातच मंडळे गर्क असल्याने त्यांना रुग्णांचे आणि प्रशासनाच्या नियमांचे काही देणे घेणे राहिले नाही. अर्थात अलीकडच्या काळात काही मंडळांनी मात्र परिवर्तनाकडे पाऊल टाकत मिरवणुकीदरम्यान ढोल-ताशा पथक सहभागी करून वाहवा मिळविली आहे. एका अर्थाने आपल्या पारंपरिक वाद्यांचे आणि वादनाचे जतन त्यामुळे होते. शिवाय नवीन पिढीला या वाद्यांची ओळख होऊन तो वारसा पुढे चालविला जातो. ही मंडळे अभिनंदनास पात्र आहेतच. तथापि, त्यांनीसुद्धा आवाजाची मर्यादा बाळगायला हवी. सर्वच मंडळांनी त्याचे अनुकरण करणे गरजेचे आहे.
नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई
उत्सव हा आनंदासाठी हवा, उपद्रवासाठी नको. डीजेमुळे कोणालाही त्रास होऊ नये यासाठी आपण बैठक बोलाविली होती. मंडळांना त्याबाबत मार्गदर्शनही केले आहे. शिवाय मिरवणूक मार्गांवर असणाऱ्या हॉस्पिटल्सची यादीही सादर केली आहे. त्याचे पालन मंडळांनी करून प्रशासनाला व आम्हाला सहकार्य करावे. नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाईल. मात्र, ती टाळण्यासाठी नियम पालन करून उत्सव परस्पर सामंजस्याने व आनंदाने साजरा करणे अधिक उचित ठरेल.
-भूषण बोरसे, पोलीस आयुक्त











