आर्ट्स सर्कलच्यावतीने कार्यक्रम
बेळगाव : आर्ट्स सर्कल बेळगाव प्रस्तूत रविवारी पहाटे रामनाथ मंगल कार्यालयात ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम झाला. याअंतर्गत गायक पं. आनंद भाटे यांच्या शास्त्रीय गायनाची मैफल झाली. या मैफलीला रसिकांची लक्षणीय उपस्थिती लाभली.
प्रारंभी सर्कलचे पदाधिकारी सदस्य रविंद्र माने यांनी स्वागत केले. त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. गायक पं. आनंद भाटे यांच्या साथीला तबल्यावर श्रीधर मांडे आणि संवादिनीवर मुकुंद गोरे होते. तानपुऱयावर अश्विनी गोरे-देशपांडे आणि श्रीवत्स हुद्दार होते.
पं. आनंद भाटे यांनी प्रातःकालीन राग तोडीने आपल्या गायनाची सुरुवात केली. विलंबित एकतालातील ‘चंगे नैनोंवाली’ आणि द्रुत तीनतालातील ‘लंगर कंकरिये’ या दोन बंदिशी त्यांनी सादर केल्या. त्यानंतर ‘पिया के मिलन की आस’ ही जोगिया रागावर आधारित ठुमरी त्यांनी सादर केली. मध्यंतरापूर्वी पं. भीमसेन जोशी यांनी लोकप्रिय केलेला ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ हा संत नामदेवांचा अभंग त्यांनी आळविला. मध्यंतरानंतर रविंद्र माने यांनी कलाकारांचा परिचय करून दिला. सर्कलच्या अध्यक्षा लता कित्तूर यांनी सर्व कलाकारांचा सत्कार केला. पं. आनंद भाटे यांनी पं. भीमसेन जोशी आविष्कृत ललत-भटियार हा जोडराग सादर केला. त्यामध्ये ‘ओ करतार’ आणि ‘जागो जागो प्यारे’ या दोन्ही बंदिशी तीनतालात होत्या. त्यानंतर त्यांनी ‘केतकी गुलाब जुही चंपक बन फुले’ ही बसंत-बहार रागातील द्रुत एकतालातील रचना सादर केली. संगीत मानापमान नाटकातील ‘खरा तो प्रेमा’, संगीत कान्होपात्रा नाटकातील ‘जोहार मायबाप जोहार’ आणि पं. भीमसेन जोशी यांनी लोकप्रिय केलेली ‘जो भजे हरि को सदा’ ही भैरवी गाऊन त्यांनी सांगता केली. रविंद्र माने यांनी आभार मानले. मैफलीला रसिकांची लक्षणीय उपस्थिती होती.









