रत्नागिरी :
भारतीय हवामान विभाग यांच्याकडून हवामानविषयक प्राप्त माहितीनुसार रत्नागिरी जिह्यात 5 ते 7 एप्रिल या कालावधीत काही ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जिह्यातील काही ठिकाणी वादळी वारे व विजांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता यापूर्वी वर्तवण्यात आली होती. सद्या हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. होळीनंतर पारा वाढणार असल्याचे हवामान विभागाने कळविले होते. तर दुसरेकडे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. सद्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अवकाळीचा मारा सुरूच आहे. अनेक भागात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसताना दिसतोय. त्याबरोबरच राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळीच्या सरी बरसताना दिसत आहेत. राज्यभरासह कोकणातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडला. सध्या चक्राकार वारे वाहत आहेत. यामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील बाष्प वाऱ्यांमुळे संगम होत आहे. रत्नागिरी जिल्हाभरात ढगाळ वातावरण आणि वाढलेल्या प्रचंडतापमानाने सारेच हैराण झाले आहेत.








