कर्नाटक आपत्ती निवारण विभागातर्फे आकडेवारी जाहीर
बेळगाव : मान्सूनने यावर्षी बेळगाव जिल्ह्याला जोरदार तडाखा दिला. मे महिन्याच्या मध्यावधीपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस सप्टेंबर महिन्यातही सुरू आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात 25 टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात 476 मिलीमीटर सरासरी पाऊस असताना यावर्षी मात्र 595 मिलीमीटर इतका पाऊस झाल्याची आकडेवारी कर्नाटक आपत्ती निवारण विभागाच्यावतीने जाहीर करण्यात आली आहे. जून तसेच ऑगस्ट महिन्यात मुसळधार पावसाने झोडपून काढले. यामुळे नद्यांना पाणी येऊन अनेक रस्ते बंद झाले. पाणी भरल्याने शाळांनाही सुटी द्यावी लागली होती.
बेळगाव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस खानापूर तालुक्यात झाला आहे. यावर्षी खानापूरमध्ये 1915 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हुक्केरी येथे 438 मि.मी. पाऊस झाला. खानापूर व इतर तालुक्याच्या तुलनेत बेळगाव व बैलहोंगल तालुक्यात पाऊस कमी झाला आहे. बेळगाव तालुक्यात यावर्षी 787 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर बैलहोंगल 390 मि.मी. इतकाच पाऊस झाला आहे. हे दोन तालुके वगळता इतर भागात चांगला पाऊस झाल्यामुळे यावर्षी जिल्ह्यातील एकूण पावसाचे प्रमाण 25 टक्क्याने वाढले आहे. जून महिन्यात जिल्ह्यात 217 मि.मी. जुलैमध्ये 191 मि. मी. तर ऑगस्ट महिन्यात 213 मि. मी. पाऊस झाला आहे. ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद वेधशाळेने केली आहे. त्यामुळे कृष्णा, मलप्रभा, घटप्रभा, मार्कंडेय, वेदगंगा, दूधगंगा, हिरण्यकेशी या नद्यांना ऑगस्ट महिन्यात पूरस्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले.
जिल्ह्यामध्ये झालेली पावसाची नेंद
- तालुका पावसाची नोंद मि.मी.
- खानापूर 1915 मी. मी.
- हुक्केरी 438 मी. मी.
- बेळगाव 787 मी. मी.
- बैलहोंगल 390 मी. मी.









