सर्वाधिक खानापुरात तर सर्वात कमी अथणीत
बेळगाव : गेल्या आठ दिवसांमध्ये पावसाला जोरदार सुरुवात झाली. तर गेल्या तीन दिवसांत दमदार पाऊस कोसळला. यामुळे नदी-नाले तुडुंब झाले आहेत. रविवारी दिवसभर दमदार पाऊस कोसळला. त्यानंतर सोमवारी पहाटे पावसाची रिपरिप सुरू होती. मात्र दिवसभर पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिली होती. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झालेल्या परिसराला दिलासा मिळाला आहे. जुलै महिन्यामध्ये जिल्ह्यात एकूण सरासरी 236 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी वळिवाने पाठ फिरविली होती. त्याचबरोबर मान्सूनही तब्बल दीड महिना लांबला होता. त्यामुळे साऱ्यांच्याच तोंडचे पाणी पळाले होते. पिण्याचा पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला होता. याचबरोबर पिकेही वाया जाण्याची भीती व्यक्त होत होती. मात्र गेल्या आठ दिवसांपासून पावसाला सुरुवात झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या चार दिवसांत तर पावसाने दमदार हजेरी लावल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. नदी-नालेही तुडुंब झाले आहेत. शेतकऱ्यांना शापित ठरलेल्या बळ्ळारी नाला परिसरालाही पुराची स्थिती निर्माण झाली आहे. याचबरोबर मार्कंडेय नदीकाठावरील शेतीही पाण्याखाली गेली आहे. सोमवारी मात्र पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिल्याने जनजीवन पूर्वपदावर आले आहे. गेल्या आठ दिवसांत सर्वात जास्त खानापूर आणि त्या खालोखाल बेळगाव तालुक्यामध्ये पाऊस झाला आहे. सध्या बळीराजा भात लावणीच्या कामामध्ये गुंतला असून इतर कामांकडेही लक्ष दिले आहे. पावसामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली आहे. याचबरोबर बळीराजाही सुखावला आहे.









