सरकारच्या प्रोत्साहन धनाचा सदुपयोग : अस्पृश्यता, जातीय संघर्ष दूर होण्यास मदत : नवउद्योगाद्वारे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याचा प्रयत्न
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यामध्ये आंतरजातीय विवाहात गेल्या काही वर्षांत वाढ झाली असून सरकारच्यादृष्टीने ही बाब समाधानकारक आहे. धर्मनिरपेक्ष समाजनिर्मिती, जातीय संघर्ष दूर करणे, अस्पृश्यता निवारण यासारख्या धोरणांतून सरकार आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देत आहे. आंतरजातीय विवाह केल्यास जोडप्यांना सरकारकडून प्रोत्साहन धन देण्यात येते. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यात आंतरजातीय विवाहाची संख्या प्रतिवर्षी वाढत आहे. मागील तीन वर्षांचा आढावा घेतल्यास एकूण 1 हजार 575 जणांनी आंतरजातीय विवाहासाठी अर्ज केले असून त्यामध्ये 1 हजार 290 दांपत्यांना सरकारकडून प्रोत्साहन धन मिळाले आहे. सरकारकडून आतापर्यंत एकूण 25 कोटी रुपयांहून अधिक प्रोत्साहन धन उपलब्ध झाले आहे. आंतरजातीय विवाह व त्याद्वारे सरकारकडून मिळणाऱ्या प्रोत्साहन धनाचा सदुपयोग करण्यात राज्यात बेळगाव जिल्हा पाचव्या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तरुणीच पुढे
सरकारमार्फत प्रोत्साहन धन मिळविण्यात अनुसूचित जाती-जमातीतील तरुणीच अधिक प्रमाणात आहेत. अलीकडच्या काही वर्षांत अनुसूचित जाती-जमातीतील तरुणी उच्चशिक्षण घेत असून याद्वारे अस्पृश्यता तसेच जातीयतेतून बाहेर येऊन नव्या जीवनाची सुरुवात केली आहे. अनेकांनी आंतरजातीय विवाह करून सरकारकडून मिळणाऱ्या प्रोत्साहन धनाचा सदुपयोग केला आहे. नवे उद्योग स्थापन करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याचा प्रयत्न केला असल्याचे समाजकल्याण खात्याने म्हटले आहे.
जागृतीची गरज
अनुसूचित जाती-जमातीतील तरुणीने अन्य जातीच्या तरुणाशी विवाह केल्यास त्या नवदांपत्याला 3 लाख रुपये, उच्चवर्णातील तरुणीने अनुसूचित जाती-जमातीतील तरुणाशी विवाह केल्यास 2.5 लाख रुपये प्रोत्साहन धन सरकारकडून देण्यात येते. आंतरजातीय विवाह केलेल्यांनी विवाह झाल्यानंतर वर्षाच्या आतच नोंदणी करणे आवश्यक आहे. या दांपत्यांना मंजूर झालेल्या प्रोत्साहन धनापैकी 50 टक्के रक्कम नवदांपत्याच्या नावे ठेव स्वरुपात ठेवली जाते. उर्वरित रक्कम नवदांपत्याच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते. सरकारच्या या योजनेची अनेकांना माहिती नसल्याने अर्थातच जनजागृतीअभावी आंतरजातीय विवाहात जिल्ह्याने अद्याप म्हणावी तितकी प्रगती साधलेली नाही, असे मतही व्यक्त होताना दिसते.
आंतरजातीय विवाहाचे प्रमाण
- वर्ष विवाह
- 2021-22 448
- 2022-23 268
- 2023-24 362
- 2024-25 497









