बेळगाव जिल्ह्यात नोंदणी 7.73 लाख : कार्यरत 3.39 लाख : जागृती मोहिमेला यश
बेळगाव : रोजगार हमी योजनेतून ग्रामीण भागातील अकुशल कामगारांना रोजगार देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबावे, आहे त्या ठिकाणीच रोजगार उपलब्ध व्हावा. या उद्देशाने सुरू केलेल्या या योजनेत बेळगाव जिल्हा आघाडीवर असून महिलांना रोजगार देण्यात जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. या आर्थिक वर्षात जिल्ह्यामध्ये 7.73 लाख महिला कामगारांची नोंद झाली असून, यापैकी 3.39 लाख महिला कार्यरत आहेत. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यात बेळगाव जि. पं. राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. यामध्ये प्रामुख्याने महिला कामगारांना रोजगार मिळून देण्यात आघाडीवर आहे. त्यामुळे राज्यात जि. पं. चे नाव कौतुकाने घेतले जात आहे. अधिकाऱ्यांच्या पुढाकारातून ग्रामीण भागातील जनतेला रोजगार मिळवून देण्यात जि. पं. यशस्वी ठरली आहे. यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने ग्रामीण भागातील जनतेला रोजगाराची अत्यंत आवश्यकता होती. आशा कठीण काळात रोजगार मिळवून देण्यात घेतलेले परिश्रम यशस्वी ठरले आहेत. प्रत्येक ग्रा. पं. पातळीवर याबाबत जागृती करून रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासाठी गावागावात असणाऱ्या महिला स्वसाहाय्य संघ यांचीही मदत घेण्यात आली आहे. त्यामुळेच महिलांना अधिक प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यात यश आले असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
स्थलांतर थांबविण्यासाठीच रोहयो
ग्रामीण भागातील जनता रोजगारासाठी स्थलांतरित होत असते. हे थांबविण्यासाठी असलेली रोजगार हमी योजना समर्पकपणे राबविली आहे. महिलांना अधिक रोजगार मिळून देण्यात बेळगाव जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. यामध्ये महिला स्वसाहाय्य संघाचेही सहकार्य आहे.
-हर्षल भोयर (जि. पं.मुख्य कार्यकारी अधिकारी)









