जि.पं.कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतली विकास आढावा बैठक : 410 कोटी नुकसान भरपाईसाठी केंद्राकडे प्रस्ताव
बेळगाव : जिल्ह्यामध्ये पीएमएफएमई (लघु आहार उद्योग) योजनेंतर्गत 514 लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य देऊन हे उद्योग यशस्वीपणे कार्यरत आहेत. ही योजना राबविण्यात राज्यामध्ये जिल्हा आघाडीवर आहे तर देशामध्ये पाचव्या स्थानावर आहे. याबद्दल जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. जिल्हा पंचायत सभागृहात गुरुवारी जिल्ह्यातील विविध खात्यांचा विकास आढावा बैठक घेऊन ते बोलत होते. जिल्ह्यातील कृषी, बागायत, रेशिम आणि पशुसंगोपन खात्याच्या जिल्हा व तालुकानुसार विकास जाणून घेतला. कृषी खात्याने सर्वाधिक शेतकऱ्यांना उपयोगी ठरतील यानुसार योजना राबवाव्यात. कृषी खात्याने शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या सोयीनुसार कृषी खात्याच्या योजना राबविण्यात याव्यात. यामुळे शेतकऱ्यांना मदत होणार आहे. सध्या दुष्काळी परिस्थिती असून शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ होईल. शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारे समस्या निर्माण होवू नयेत. या दृष्टिने योजनांची अंमलबजावणी करावी. शेतकऱ्यांकडून कोणत्याच प्रकारची तक्रार येवू नये, याची दखल घ्यावी, अशी सूचना राहुल शिंदे यांनी कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना केली.
खरीप हंगामात 3.54 लाख हे. पीकहानी
यावेळी कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण, झालेली पेरणी व पावसाअभावी शेतकऱ्यांना सोसावे लागलेले नुकसान या संदर्भातील आकडेवारी सादर केली. पावसाअभावी खरीप हंगामात पेरणी केलेल्या 3.54 लाख हेक्टर क्षेत्रातील पीकहानी झाली असल्याचे सांगण्यात आले. 410.11 कोटी नुकसान भरपाई देण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून 2 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. यासाठी तयारी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रोजगार हमी योजनेंतर्गत उद्योग उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्या दृष्टिने क्रिया योजना तयार करण्यात आली आहे, अशी माहिती योजना अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. यावेळी राहुल शिंदे यांनी प्रलंबित असलेली कामे वेळेत पूर्ण करून 100 टक्के विकास साधावा, अशी सूचना केली. तर रोजगार हमी योजनेंतून काम करणाऱ्या कामगारांना वेळेत वेतन द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली. जिल्ह्यामध्ये 11.69 लाख हेक्टर क्षेत्रात बागायत पीक क्षेत्र आहे. यापैकी 59091 हेक्टर क्षेत्रात बागायती पिके आहेत. रोजगार हमी योजनेंतर्गत बागायती पिके घेतली जात आहेत.
शेतकऱ्यांच्या मुलांना 10 महिन्यांच्या कालावधीसाठी बागायत पिके आधारीत प्रशिक्षण
हुक्केरी तालुक्यातील हिडकल डॅम बागायत क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना 10 महिन्यांच्या कालावधीसाठी बागायत पिके आधारीत प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे बागायत अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी कृषी खात्याचे उपसंचालक एस. बी. कोंगवाड, चिक्कोडी विभाग कृषी खात्याचे उपसंचालक एच. डी. कोळेकर यांच्यासह बागायत व इतर खात्याचे अधिकारी उपस्थित होते.









