3 कोटी पर्यटकांची भेट : पर्यटन विभागाची माहिती : डिसेंबर-जानेवारीत पर्यटक अधिक
बेळगाव : जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांना 2023 मध्ये तब्बल 3.95 कोटी पर्यटकांनी भेट दिली आहे. यामध्ये मंदिरे, किल्ले, धबधबे, अभयारण्ये आदींचा समावेश आहे. त्यामुळे बेळगाव जिल्हाही पर्यटनस्थळ म्हणून पुढे येऊ लागला आहे. राजहंसगड किल्ला, सौंदत्ती यल्लम्मा डोंगर, जोगनभावी, गोकाक फॉल्स, गोडचिनमलकी, भीमगड अभयारण्य, सोगल सोमनाथ, चिंचली मायाक्का यासह इतर प्रमुख पर्यटनस्थळे आहेत. बेळगाव तालुक्यातील राजहंसगड किल्ला, सौंदत्ती यल्लम्मा डोंगर, कित्तूर चन्नम्मा किल्ला आदींचा विकास साधला जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना महत्त्व प्राप्त होऊ लागले आहे. त्याचबरोबर भुतरामहट्टी येथे प्राणीसंग्रहालय सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटकांच्या संख्येत भर पडू लागली आहे.
कोरोना काळानंतर पर्यटनस्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्याचबरोबर जूनपासून महिलांचा मोफत प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे पर्यटनस्थळांना उधाण आले आहे. विशेषत: डिसेंबर ते जानेवारी हा पर्यटन काळ म्हणून ओळखला जातो. या कालावधीत धार्मिक स्थळे, किल्ले, अभयारण्य, प्राणीसंग्रहालय आणि इतर ठिकाणी भेटी देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. गतवर्षी तब्बल 3 कोटींहून अधिक पर्यटकांनी विविध स्थळांना भेटी दिल्या आहेत. राजहंसगडाला 7 लाख 71 हजार 351, सुळेभावी महालक्ष्मी 61 हजार 56, कित्तूर राणी चन्नम्मा किल्ल्याला 2 लाख 10 हजार 450, शिरसंगी कालिका मंदिर 7 लाख 78 हजार 316, वीरभद्र मंदिराला 5 लाख 51 हजार 400, मायाक्का चिंचली देवीला 5 लाख 62 हजार 50, निडसोशी मठाला 2 लाख 42 हजार 664 यासह इतर मंदिरांना भक्तांनी आणि पर्यटकांनी भेट दिली आहे.
पावसाळ्यातही पर्यटक अधिक
पावसाळ्याच्या हंगामात वर्षापर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या पर्यटकांची संख्याही मोठी आहे. गोकाक फॉल्स, गोडचिनमलकी यासह इतर लहान धबधब्यांना पर्यटक भेटी देतात. त्याचबरोबर डिसेंबर आणि जानेवारीदरम्यान शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते. त्यामुळे या काळात पर्यटकांची संख्या अधिक असते.
पर्यटनस्थळांचा अधिक विकास करणार
गेल्या वर्षीपासून जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. मंत्री एच. के. पाटील यांनी जिल्हा पर्यटन विभाग बळकट करण्यासाठी अनेक योजना आखल्या आहेत. येत्या काळात पर्यटनस्थळांचा अधिक विकास केला जाणार आहे.
– जगदीश पाटील, उपसंचालक,पर्यटन विभाग









