750 नव उद्योजकांना कर्ज वितरण
प्रतिनिधी/ बेळगाव
औद्योगिककरणाला प्रोत्साहन देण्याबरोबरच नवीन उद्योजकांना उद्योग उभा करण्यासाठी आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री उद्योग सृजन योजना (पीएमईजीपी) राबविण्यात येत आहे. या योजनेतून नवीन उद्योजकांना आर्थिक पाठबळ देण्यात येत आहे. यामध्ये बेळगाव जिल्हा आघाडीवर असल्याचे जिल्हा औद्योगिक केंद्राच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
जिल्हा औद्योगिक केंद्राच्या माध्यमातून पीएमईजीपी माध्यमातून गेल्यावर्षी 162 जणांना उद्योग उभा करण्यासाठी कर्ज देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र सदर केंद्राकडून जिल्ह्यामध्ये 750 जणांना कर्ज वितरीत करण्यात आले आहे. ठेवण्यात आलेले उद्दिष्ट गाठून कर्ज वितरीत करण्यात आले आहे. यावर्षीही (2023-24) 162 जणांना कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत 189 जणांना पीएमईजीपी योजनेंतर्गत कर्ज देण्यात आले आहे. यावर्षीही उद्दिष्ट गाठून कर्ज देण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा औद्योगिक केंद्र नवीन उद्योजकांना उद्योग उभारण्यासाठी कर्ज वितरण करण्यात आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.
जिल्हा औद्योगिक केंद्र व केंद्रसरकारच्या खादी आयोगाला योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. योजनेतून कर्ज घेण्यासाठी अर्ज दाखल केलेल्या अर्जदाराची कागदपत्रे छाननी करून बँक अधिकाऱ्यांना कळविण्यात येते. यानंतर केंद्र सरकारच्या खादी आयोगाकडून अर्ज केलेल्या उद्योजकांना 11 दिवस ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणामध्ये जीएसटीसह उद्योग कसा चालवावा याबाबत प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण झाल्यानंतर कर्ज वितरण करण्यात येते. उद्योग उभा करण्यात येणाऱ्या जागेची व प्रकल्पाची पाहणी बँक अधिकाऱ्यांकडून केली जाते. त्यानंतर टप्याटप्प्याने कर्ज वितरण करण्यात येते. लाभार्थ्यांला केंद्र सरकारकडून ग्रामीण उद्योजकांना 35 तर शहरी उद्योजकांना 25 टक्के सबसिडी दिली जाते. उर्वरीत 65 टक्के कर्ज व्याजासहीत हप्त्यानुसार भरावे लागते. या योजनेंतर्गत कच्च्या वस्तूंपासून पक्की वस्तू तयार करणाऱ्या उद्योजकांना 5 ते 50 लाखापर्यंत कर्ज वितरण करण्यात येते.
सत्यनारायण भट (संयुक्त संचालक, जिल्हा औद्योगिक केंद्र)
पीएमईजीपी या योजनेतून नवीन उद्योजकांना प्रोत्साहन दिले जाते. ऑनलाईनद्वारे अर्ज करण्याची सुविधा असून ऑनलाईनवरच त्याची छाननी करून अर्जदारांना माहिती दिली जाते. रद्द केलेला अर्ज कोणत्या कारणानी रद्द केला याची माहितीही दिली जाते. एजंटाच्या आहारी न जाता ऑनलाईनवर अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा.









