ज्ञानवापीतील हातपाय धुण्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
वाराणसीतील ज्ञानवापी परिसरात मुस्लिमांना नमाजाआधी हातपाय धुण्याची अनुमती देण्यासंबंधी निर्णय वाराणसीच्या जिल्हाधिकाऱयांनी घ्यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. जिल्हाधिकाऱयांनी प्रशासकीय अधिकारी, या प्रकरणातील सर्व पक्षकार आणि इतर संबंधितांची बैठक घेऊन सामोपचाराने निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने आपल्या सोमवारच्या आदेशात स्पष्ट केले आहे.
मुस्लीम ज्या तलावात हातपाय धुतात त्या तलावात पुरातन शिवलिंग असल्याचे दिसून आले आहे. असे प्रतिपादन हिंदू पक्षकरांनी केले होते. त्यामुळे या तलावात हातपाय धुण्यास (वुजू करण्यास) स्थगिती देण्यात आली होती. मात्र, सध्या रमझानचा महिना सुरु असल्याने हातपाय धुण्यासाठी स्थगिती उठवावी, किंवा पर्यायी व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी मुस्लीम पक्षकारांनी केली आहे.
मोबाईल वॉशरुम द्या
अंजुमान इंतजामिया समितीने आपल्या युक्तिवादात पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली. मुस्लिमांसाठी मोबाईल वॉशरुम देण्यात यावी. त्यामुळे नमाज पढणाऱयांची सोय होणार आहे. उत्तर प्रदेश सरकारचा पक्ष मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी या मागणीला विरोध केला नाही. तलावाच्या शेजारीच मंदिराचे गर्भगृह आहे. त्याचे पावित्र्य भंग होणार नाही, अशाप्रकारे व्यवस्था करण्यात यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने वाराणसी प्रशासनाला सर्वांसमवेत बैठक घेऊन निर्णय घेण्याचा आदेश दिला.
आज मंगळवारी बैठक
वाराणसी प्रशासनाची या संबंधातील बैठक 18 एप्रिलला, अर्थात आज मंगळवारी व्हावी, अशीही सूचना न्यायालयाने केली. त्यानुसार ही बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत जे निर्धारित करण्यात येईल, त्याचा अहवाल शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवण्यात यावा, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे रमझानचा महिना लक्षात घेऊन निर्णय घ्यावा अशी मुस्लीम पक्षकारांची मागणी आहे. त्यासंबंधी वाराणसी प्रशासन कोणता निर्णय घेते, यासंबंधी लवकरच माहिती मिळणार आहे. आज मंगळवारी यासंबंधीचा निर्णय होणार आहे.









