रत्नागिरी :
रत्नागिरीसह जिल्ह्यात सोसाट्याचा वारा, विजांचा लखलखाट आणि कडकडाटात गुरुवारी पहाटे कोसळलेल्या धो–धो पावसाने धुमाकूळ घातला. रत्नागिरी शहरासह तालुक्यातील बहुतांश भागात या पावसाने गटारेही तुडुंब भरून वाहली, इतका पाऊस कोसळला. त्यामुळे गुरुवारी सकाळपर्यंत अनेक भागात वीजपुरवठा गायब झाल्याने नागरिक प्रचंड उकाड्याने जणू हैराण झाले होते. या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील आंबा, काजू बागायतदार, शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
गेले 2 ते 3 दिवस हवामान खात्याने रत्नागिरी जिह्यासाठी यलो अलर्ट जारी केला होता. वातावरणात तापमानाचा वाढलेल्या उच्चांकी पाऱ्याने सर्वांच्या अंगाची जणू काहिली सुरू आहे. दुपारनंतर पावसाला अनुकूल वातावरण तयार होत असल्याने अवकाळीसाठी निमंत्रण देणारे ठरत आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, गुरुवारी पहाटे सुमारे 2.30च्या सुमारास अवकाळी पावसाच्या आगमनाने वर्दी दिली. सोसाट्याच्या वाऱ्याबरोबरच विजांचा लखलखाट व कडकडाटात रत्नागिरीत सर्वत्र पावसाने धुडगूस घातला. सुमारे तास ते दीड तासभर रत्नागिरी शहरासह तालुक्यातील अनेक भागात धो–धो पाऊस कोसळला. त्यामुळे पाणीच पाणी पसरले. ऐन उन्हाळ्यात या पडलेल्या अवकाळी पावसाने गटारेही तुडुंब भरून वाहली. पहाटेच्या सुमारास पडलेल्या या अवकाळी पावसाने साऱ्या लोकांसह बागायतदारांचीही झोप उडवली होती.
- बागायतदारांसमोर अवकाळीचे विघ्न
अवकाळी पावसाच्या प्रभावामुळे येथील आंबा–काजू बागायतदारांसमोर अगोदरपासूनच चिंता उभी आहे. या हंगामात दरवर्षीच्या मानाने हापूस उत्पादन निम्मेही नसल्याचे बागायतदारांमधून सांगितले जात आहे. बागायतदारांना या चालू हंगामात आतापर्यंत केवळ 5 टक्के उत्पन्नच हाती लागले आहे. अशातच या अवकाळीचे विघ्न उभे ठाकले आहे.
- अवकाळी पावसाचे सातत्य राहिल्यास वाढवेल चिंता
हापूस उत्पादन हा येथील आंबा बागायतदार, शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नाचा महत्वाचा भाग मानला जातो. त्यावर या सुरू झालेल्या हंगामात वारंवार अवकाळीची बाधा उभी राहत आहे. आताही हे संकट उभे आहे. पण गुरुवारी रत्नागिरीत पडलेल्या धुवाँधार पावसाने हापूस उत्पादनावर फारसा मोठा परिणाम जाणवलेला नाही. पण सलग 2 ते 3 दिवस या अवकाळीचे संकट कायम राहिल्यास त्याचा प्रभाव हापूसवर होण्याचा दाट संभव आहे. कारण या पावसाचा परिणाम आंब्यावर डाग व बुरशीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढतो, असे रत्नागिरीतील आंबा बागायतदार प्रसन्न पेठे यांनी बोलताना सांगितले.
- पुढील 4 दिवस अवकाळी पाऊस
मध्य महाराष्ट्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकणात ढगाळ वातावरण दिसत आहे. तसेच पुढील 3 ते 4 दिवस अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे आंबा व काजू पिकाची काळजी घेण्याचे आवाहन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे. अशाप्रकारचे वातावरण कीड व रोग प्रादुर्भावासाठी अनुकूल आहे. या वातावरणात आंबा पिकावर फुलकिडी आणि फळमाशी या किडींचा तसेच करपा रोगाचा व काजू पिकावर ढेकण्या, फुलकिड आणि बोंडू व बी पोखरणारी अळी यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. आंबा व काजू बागायतदारांनी आपल्या बागेची नियमितपणे पाहणी करुन कीड व रोगनिहाय उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कृषी विद्यापीठाने केले आहे.








