पंतप्रधान मोदी यांच्या कार्यालयाने केले स्पष्टीकरण
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दक्षिण आफ्रिकेतील शहर जोहान्सबर्ग येथे नुकत्याच पार पडलेल्या ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांच्यात अत्यल्प काळासाठी चर्चा झाली आहे. मात्र, या चर्चेसाठी कोणी पुढाकार घेतला होता, यावर आता वादंग निर्माण झाले आहे. चीनने ही भेट भारताच्या विनंतीवरुन झाल्याचा संदेश ट्विटरवर प्रसारित केला होता. तथापि, भारताच्या प्रशासनाने ही बाब खोटी असून चीननेच चर्चा करण्याची इच्छा प्रगट केल्याचे प्रतिपादन केले.
पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांच्या चर्चेचा प्रस्ताव चीननेच आधी ठेवला होता. तशी विनंती त्या देशाकडून करण्यात आली होती. तथापि, भारताने आपला होकार कळविला नव्हता. मात्र, चीनची इच्छा असल्याने भारतानेही चर्चेचा कार्यक्रम ऐनवेळी आयोजित केला. ब्रिक्स परिषदेच्या आधी भारताची तशी योजना नव्हती. दोन्ही नेत्यांही ही भेट अत्यंत औपचारिक होती. त्यात कोणत्याही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली नाही, असे पंतप्रधान मोदींच्या कार्यालयाने स्पष्ट केले.
चर्चा नेमकी काय
कोणत्याही महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली नाही. तसेच कोणतीही आश्वासने देण्यात आलेली नाहीत. भारत आणि मध्ये होत असलेल्या लडाखच्या सीमेच्या संघर्षासंबंधी थोडक्यात बोलणी झाली. दोन्ही नेत्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना सीमावादावर आणि सध्याच्या संघर्षावर सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी चर्चा करण्याची सूचना देण्याचे मान्य केले, अशी माहिती देण्यात आली.
ऑगस्टच्या प्रारंभीच्या दिवसांमध्ये भारत आणि चीन यांच्या सेनाधिकाऱ्यांमध्ये लडाख सीमासंघर्ष संपविण्यासंबंधी चर्चा झाली होती. या चर्चेसंबंधी बऱ्याच आशा केंद्रीत झाल्या होत्या. तथापि, नंतर चर्चा असफल ठरल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग यांच्यामधील चर्चेत निश्चित तोडगा काढला जाईल, अशी आशा काही तज्ञांना वाटत होती. तथापि, भारताच्या स्पष्टीकरणानुसार दोन्ही नेत्यांनी चर्चा अशी केलेलीच नाही असे स्पष्ट झाले.









