जगातील दुसरा सर्वात खोल ब्ल्यू होल मेक्सिकोच्या युकाटन बेटाच्या किनाऱयावर शोधला गेला आहे. ही गुहा चेतुमल उपसागरात पाण्याखाली सुमारे 900 फुटांच्या खोलीवर असून 1,47,000 चौरस फूट भागात फैलावलेली आहे. जगातील सर्वात खोल ब्ल्यू होल दक्षिण चीन समुद्रात असून त्याचे नाव ड्रगन होल आहे. त्याचा 2016 मध्ये शोध लागला होता. तसेच डॅगन होल 980 फुटांपेक्षा अधिक खोल असल्याचे मानले जाते.
ब्ल्यू होल पृष्ठभागापासून 900 फुटांच्या खोलीवर असून 1,47,000 चौरस फुट भागात फैलावलेली आहे. सागरात आढळून येणारे मोठे सिंकहोल किंवा गुहांना ब्ल्यू होल म्हटले जाते. या गुहा किनारी क्षेत्रांमध्ये आढळून येतात. अनेकांमध्ये कोरल, सागरी कासव आणि शार्क समवेत सागरी रोपे असतात. ब्ल्यू होल चेतुमलमध्ये असून त्याचे नाव ताम जा आहे. याचा अर्थ खोल पाणी असा होतो. या सुमारे 80 अंशाच्या उभ्या भुजा असून गुहेचे मुख समुद्रसपाटीपासून सुमारे 15 फूट खाली आहे.

मेक्सिकोच्या नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजीद्वारे समन्वित एक सार्वजनिक संशोधन केंद्र एल कोलेजियो डे ला फ्रोन्टेरा सुरच्या वैज्ञानिकांनी पहिल्यांदा 2021 मध्ये याचा शोध लावला होता. या शोधाशी निगडित संशोधन प्रंटियर्स इन मरीन सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.
समुद्राचे पाणी चुनादगडाच्या संपर्कात आल्यावर ब्ल्यू होल तयार होत असतात. चुनादगडासोबत पाण्यातील रसायनांचा संपर्क होत असतो. जगातील अनेक ब्ल्यू होल मागील हिमयुगांदरम्यान तयार झाले असावेत असे मानले जाते. परंतु किनारी क्षेत्रांमध्ये वारंवार येणारे पूर अणि ड्रेनिंगमुळे पर्वत नष्ट होत रिकाम्या जागा निर्माण झाल्या असतील. सुमारे 11 हजार वर्षापूर्वी अखेरच्या हिमयुगाचा अंत झाला आणि समुद्राची पातळी वाढल्यावर या गुहा पाण्याने भरून गेल्या तर काही पूर्णपणे बुडाल्या.
पृथ्वीचा इतिहास
ब्ल्यू होल्सपर्यंत पोहोचणे सोपे नसते, याचमुळे वैज्ञानिकांना यातील अनेकांबद्दल जाणून घेता आलेले नाही. ब्ल्यू होलमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते आणि सूर्यप्रकाश केवळ पृष्ठभागावर असतो. अशा स्थितीतही येथील जीवसृष्टी विकसित होत गेली आहे. तेथील जीवांनी कमी ऑक्सिजनमध्येही तग धरून राहण्याची कला विकसित केली आहे. हजारो वर्षांपूर्वी जीवन कसे होते याची माहिती ब्ल्यू होलच्या संशोधनातून मिळू शकते. अधिक ऑक्सिजन आणि प्रकाशाशिवाय जीवाश्म उत्तमप्रकारे संरक्षित राहू शकतात, यामुळे वैज्ञानिकांना विलुप्त प्रजातींच्या अवशेषांची ओळख पटविण्यास मदत मिळते.
ब्ल्यू होल अन्य ग्रहांवरील जीवसृष्टीबद्दलही माहिती देऊ शकतात. संशोधकांनी बहामासच्या ब्ल्यू होलमध्ये पाहणी केली असता त्यांना बॅक्टेरिया आढळून आले आहेत. तेथे अन्य कुठलेच जीवन नव्हते. सौरमंडळात प्रतिकूल वातावरणात कशाप्रकारचे जीवन असू शकते याचा अंदाज याद्वारे लावता येणार आहे.









