कोल्हापूर / अहिल्या परकाळे :
कोल्हापूर महापालिका केएमटीला 100 इलेक्ट्रिक बसेस मिळणार आहेत. या बसेसच्या चार्जिंग स्टेशनसाठी गोकुळ शिरगावपासून केएमटी वर्कशॉप पर्यंत विद्युत वाहिनी आणली जाणार आहे. त्यासाठी सायबर चौक ते बुध्द गार्डनमधील वर्कशॉप पर्यंत केबल टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. परंतू केबल टाकण्यासाठी चांगल्या डांबरी रस्त्याची खुदाई केल्याने सगळीकडे खड्ड्यांचे व धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
इलेक्ट्रिक बसेससाठी गोकुळ शिरगाव येथून 10 किलोमिटरची 33 के. व्ही. क्षमता असलेली विद्युत वाहिनी केएमटी वर्कशॉप पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. या विद्युत वाहिनीसाठी राज्य शासनाने 10 कोटी 40 लाखाचा निधी मंजूर केला आहे. चार्जिंग स्टेशनसाठी नवीन डेपो उभारला आहे. तर उजळाईवाडी येथील शाहू नाका ते केएमटी वर्कशॉप पर्यंत विद्युत वाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. येत्या चार ते सहा महिन्यात सर्व प्राथमिक सोयी –सुविधा पूर्ण करून चार्जिंग स्टेशन सुरू केले जाणार आहे. परंतू सध्या रेड्याची टक्कर ते एनसीसी भवनपर्यंतच्या रस्त्याची खुदाई केल्यामुळे रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. मुरूम पसरला असला तरी मोठ–मोठे खड्डे व जमिनीतून निघालेल्या दगडांमुळे दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत. तर काही ज्येष्ठ नागरिक, लहान मुले या दगडांना ठेच काढून पडली आहेत, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. दुचाकीस्वारांना तर रस्ता ओलांडताना जीव मुठीत घेवून रस्ता ओलांडावा लागतो.
गोकुळ शिरगाव, उजळाईवाडी येथील शाहू नाका, शिवाजी विद्यापीठ चौकातील केएसबीपी, सायबर चौक, एनसीसी भवन, रेड्याची टकरीमार्गे शास्त्रीनगर केएमटी वर्कशॉप पर्यंत विद्युत वाहिनी केली जाणार आहे. सध्या शाहू नाका ते केएमटी वर्कशॉप पर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. रस्त्याच्या कडेला खुदाई केली असली तरी रस्त्या ओलांडणाऱ्यांना खड्ड्यातूनच जावे लागते. व्यवस्थितपणे मुरूम टाकला नसून पॅचवर्कही केले नाहीत. महापालिकेच्या मालकीच्या जागेतील रस्त्यांची खुदाई केली असल्याने महापालिकेने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. परंतू एनसीसी भवन ते केएमटी वर्कशॉप पर्यंत लोकवस्ती असल्याने त्यांना या खड्यांचा व धुळीचा सामना करावा लागत आहे. महापालिका हे खड्डे कधी मुजवणार व डांबरी रस्ता करणार अशी विचारणा नागरिकातून होत आहे.
- रस्ता दुरूस्तीचा प्रस्ताव
इलेक्ट्रिक बसेससाठीच्या चार्जिंग स्टेशनसाठी रस्त्याची खुदाई करून केबल टाकली आहे. त्यावर जमिनीच्या लेवलला मुरूम पसरवून घेतला आहे. हा रस्ता महापालिकेचा स्वत:चा असून रस्त्याच्या दुरूस्तीसाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर त्वरीत रस्त्याचे काम करून घेतले जाणार आहे.
सुरेश पाटील (सहाय्यक अभियंता, प्रकल्प अधिकारी)
- तर रस्त्यावर उतरून आंदोलन
रस्त्याची खुदाई करून दोन महिने उलटून गेले. तरीही आतापर्यंत महापालिकेने रस्त्याचे काम पूर्ण केले नाही. या धुळीमुळे लहान मुले, जेष्ठ नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे. तर रस्त्यावर खड्डे आणि मोठे दगड असल्याने अपघात होत आहेत.महापालिकेने त्वरित रस्ता दुरूस्त न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल.
बबन मोकाशी (नागरिक)








