मिरज :
येथे नव्याने झालेला दिघंची-हेरवाड राज्य मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. या मार्गावरील मिरज ते टाकळी व सलगरेपर्यंत एकसमान गुळगुळीत रस्ता असल्याने सर्व लहान-मोठी वाहने सुसाट असतात. या रस्त्यालगतच मंदिर, मंगल कार्यालय, शाळा व मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असताना ठिकठिकाणी गतीरोधक मात्र नाहीत. त्यामुळे अशा वेगवेगवान वाहनांमुळे वारंवार अपघात होत असून, दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात अनुष्का परशुराम म्हेत्रे या बारा वर्षाच्या बालिकेचा अपघाती बळी गेला. बांधकाम विभाग आणखी बळी जाण्याची वाट पाहतोय काय? असा सवाल नागरिकांतून केला जात आहे.
रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा व मिरजमार्गे वळविण्यात आलेला दिघंची-हेरवाड राज्य मार्ग दीड वर्षांपूर्वी अस्तित्वात आला. रुंदीकरणासह ‘हॅ म’ पध्दतीचा हा विशेष दर्जेदार रस्ता करण्यात आला आहे. शहरातील गाडवे चौकापासून सलगरेपर्यंत सुमारे २९ किलो मिटरचा हा रस्ता एकसमान आहे. कोठेही खड्डे अथवा गतीरोधक नाहीत. त्यामुळे मिरजेतून सुसाट झालेल्या वाहनांचा वेग मर्यादपेक्षा जास्त असतो. वेगवेगवान वाहनांवर लवकर नियंत्रणही मिळविता येत नाही. त्यामुळे या मार्गावर वारंवार अपघात होत आहेत. रस्ता झाल्यापासून आजवर अनेक अपघात झाले आहेत. टाकळी, बेळंकी, सलगरे गावच्या हद्दीत अनेक वेगवेगवान वाहने रस्त्याकडेला पलटी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या रस्त्याने आत्तापर्यंत अनेकांचे बळीही घेतले आहेत. धोकादायक वळणावर दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे असे अपघात होऊन निष्पापांचे बळी जात आहेत. असाच अपघात दोन दिवसांपूर्वी झाला. दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अनुष्का म्हेत्रे या निष्पाप बालिकेचा बळी गेला आहे.
राज्यमार्गालत मिरज शहरापासून अगदी सलगरेपर्यंत आजूबाजूला लोकवस्ती आहे. नागरिकांची व विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे ठिकठिकाणी गतीरोधक बसावोत, अशी मागणी नागरिकांतून होत आहेत.








