सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अडीच तास चौकशी
बेळगाव : तालुक्यातील त्या अमानवी घटनेसंदर्भात राष्ट्रीय मानव हक्क आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर चौकशीसाठी आयोगाचे डीआयजी सुनीलकुमार मीना यांनी दुपारी 4.30 वाजता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भेट देऊन पीडित महिलेची जवळपास अडीच तास चौकशी करून अहवाल घेतला. काकती पोलीस स्थानकाच्या व्याप्तीमध्ये घडलेल्या या घृणास्पद घटनेची उच्च न्यायालयाकडून दखल घेण्यात आल्याने चौकशीला गती देण्यात आली आहे. प्रकरण राज्य सरकारने सीआयडीकडे सोपविले आहे. तर राष्ट्रीय पातळीवर याची दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे नुकताच केंद्रीय मागासवर्गीय कल्याण आयोगाच्या सदस्यांनी दोन दिवसांपूर्वी भेट देऊन माहिती घेतली आहे. तर सोमवारी राष्ट्रीय मानव हक्क आयोगाच्या डीआयजींनी भेट देऊन चौकशी केली आहे. सकाळी आलेल्या चौकशी पथकाने घटना घडलेल्या गावाला भेट देऊन सखोल माहिती घेतली आहे. यानंतर दुपारी 4.30 वाजता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भेट देऊन पीडित महिलेची चौकशी करण्यात आली. यावेळी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांसह स्थानिक अधिकारी पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा या हजर होत्या. राष्ट्रीय मानव हक्क आयोगाचे डीआयजी सुनीलकुमार मीना यांच्यासह चौकशी पथकातील अधिकारी उपस्थित होते. दुपारी 4.30 ते रात्री 7.15 वाजेपर्यंत चौकशी करण्यात आली आहे. यावेळी डीआयजी सुनीलकुमार मीना यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, मानव हक्क आयोगाच्या कायद्याचे उल्लंघन झाले आहे का? याची पाहणी करण्यासाठी आपण आलो असून या संदर्भातील आवश्यक ती माहिती घेण्यात आली आहे. सदर अहवाल चौकशी समितीकडे सादर केला जाणार आहे, असे सांगितले. पत्रकारांनी अधिक प्रश्न विचारले. मात्र यावर त्यांनी बोलणे टाळले.









