पूर्वीच्या पॅटर्नप्रमाणे होणार परीक्षा : विद्यार्थ्यांना आतापासूनच परीक्षेची तयारी करावी लागणार
प्रतिनिधी /बेळगाव
दहावीच्या प्रश्नपत्रिकेची यावषी काठीण्य पातळी वाढविण्याचा विचार परीक्षा मूल्यमापन विभागाकडून करण्यात येत आहे. शाळा सुरळीतपणे सुरू झाल्याने 2019 पूर्वीच्या पॅटर्नप्रमाणेच यावषी परीक्षा घेतली जाणार आहे. तसेच 100 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घेतली जाणार असल्याने आतापासूनच विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करावी लागणार आहे.
कोरोनामुळे मागील दोन वर्षांमध्ये विद्यार्थी शाळांपर्यंत पोहचू शकले नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले. ऑनलाईन शिक्षण तितकेसे फायदेशीर ठरत नसल्याने परीक्षेवरही मर्यादा येत होत्या. त्यामुळे 2020 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेवेळी केवळ 80 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्यात आल्या. तसेच प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी कमी करण्यात आली होती.
2021 मध्येही कोरोनाचे सावट असल्याने दहावीची परीक्षा बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेद्वारे घेण्यात आली होती. यामध्ये 10 टक्के कठीण, 40 टक्के सेपे तर 50 टक्के मध्यम अशी रचना करण्यात आली होती. त्यामुळे मागील दोन वर्षांत काठिण्य पातळी कमी झाली होती.
परंतु यावषी सुरळीत पद्धतीने शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. विद्यार्थी ऑफलाईन वर्गात सहभाग होत असल्यामुळे कर्नाटक माध्यमिक परीक्षा मूल्यमापन मंडळाने परीक्षेची काठिण्य पातळी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच 100 टक्के अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिकेचे स्वरुप असणार आहे. त्यामुळे यावषी परीक्षेला बसणाऱया विद्यार्थ्यांनी 75 टक्के उपस्थिती दर्शविणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आतापासूनच परीक्षेच्या तयारीला सुरुवात करावी लागणार आहे.









