लेखा स्थायी समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना धरले धारेवर : काही बिले दोनवेळा दाखविण्याचा प्रकार
बेळगाव : महापालिकेतील खर्चाबाबत लेखा स्थायी समितीच्या अध्यक्षांसह सदस्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता बरीच तफावत दिसून आली. काही बिले दोनवेळा असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. लेखा स्थायी समितीच्या अध्यक्षा सविता मुरगेंद्रगौडा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी उपमहापौर रेश्मा पाटील यांसह इतर नगरसेवक उपस्थित होते. वाहनांची दुरुस्ती तसेच इतर खरेदीबाबतच्या बिलांची संपूर्ण तपासणी केली असता त्यामध्ये तफावत आढळून आली. विविध खटल्यांसंदर्भात वकिलांना दिलेल्या फीचीही चौकशी यावेळी करण्यात आली. काही विभागांमधून आलेल्या बिलांमध्ये चुका आढळून आल्या. त्यामुळे अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. दाखविण्यात आलेली बिलेही अधिक आहेत, असा आरोप करण्यात आला आहे.
जीएसटीची दोनवेळा नोंद
काही ठिकाणी जीएसटी दोनवेळा दाखविण्यात आली आहे. त्याबाबत नगरसेवकांनी खुलासा करण्याची मागणी केली. त्यावर विविध फायली नगरसेवकांकडे देण्यात आल्या. मात्र त्यामध्येच अनेक चुका असल्याचे नगरसेवकांनी दाखवून दिले. लेखा विभागातील बऱ्याच कर्मचाऱ्यांनी बिलांचा तपशील योग्यप्रकारे लिहिला नसल्याचे आढळून आले. त्यामुळे नगरसेवकांनी संबंधितांना चांगलेच धारेवर धरले. शहरातील आस्थापनांच्या करवसुलीबाबतही सूचना करण्यात आल्या आहेत. काहीजणांनी 10 ते 12 वर्षांपासून करभरणा केला नाही. त्यामुळे महापालिकेकडे जमा होणारी रक्कमही कमी असल्याचे दिसून आले. दिलेले उद्दिष्ट कोणत्याच महिन्यात पूर्ण झाले नाही. तेव्हा करवसुलीवरही अधिक भर द्यावा, त्यामुळे महापालिकेकडे अधिक निधी जमा होईल आणि विविध विकासकामे राबविता येतील, असे नगरसेवकांनी बैठकीत सांगितले. या बैठकीला महापालिका उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांच्या लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांसह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
‘तरुण भारत’च्या वृत्ताची घेतली दखल…
शहरातील व्यावसायिकांकडून दंड वसूल केला जात आहे. मात्र तो दंड रोजच्या रोज जमा होतो का? याची खातरजमा कोण करणार, बऱ्याच जणांकडून वसुली करून परस्पर लाटल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत, असे वृत्त ‘तरुण भारत’मधून प्रसिद्ध झाल्यानंतर गुरुवारी बैठकीमध्ये त्याची माहिती देण्यात आली. याबाबतचा अधिकाऱ्यांनी खुलासा करावा, अशी मागणी नगरसेवकांनी केली. त्यावेळी अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली होती. आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांनी मी गेल्या काही दिवसांपासून वसूल केलेला दंड बँकेत जमा केला आहे. इतर विभागांबाबत मला कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.









