पाच दिवशीय सोवळे व्रत आजपासून,तर तीन दिवशीय शनिवारपासून. धोंडगणांमध्ये मोठा उत्साह. अलिप्त राहण्राया जागांची साफसफाई, मंडप उभारणी.

डिचोली :राज्यात व बाहेरही प्रसिध्द असलेल्या शिरगाव येथील देवी श्री लईराईच्या जत्रोत्सवाची तयारी सर्वच पातळीवरून जय्यतपणे सुरू असून गेला महिनाभर शाकाहार पाळण्राया व्रतस्थ धोंडगणांच्या सोवळ्या व्रताला आज गुरूवारपासून सुरूवात होणार आहे. सर्व धोंडगण एकत्रित येऊन सोवळे व्रत पाळणार असल्याने धोंडगणांमध्येही मोठा उत्साह संचारला आहे. अलिप्त राहण्यासाठी असलेल्या जागांची साफसफाई, मंडप उभारण्याची कामे धोंडगणांकडून करण्यात येत आहे. कोवीड महामारीमुळे दोन वर्षे या धोंडगणांना आपल्या या सोवळे व्रताला न्याय देता आला नव्हता. गेल्यावर्षी कोवीड परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर धोंडगाणांनी एकत्रित येऊन हे व्रत पाळले होते. त्यानंतर यावर्षीही हि परंपरा चालूच राहणार आहे. या व्रतासाठीची सर्व तयारी धोंडगणांकडून झाली असून पाच दिवस हे सोवळे व्रत पाळणारे धोंडगण आजपासून आपापल्या ठराविक जाग्यांवर या व्रतादा देवीच्या नामस्मरणात न्याय देणार आहेत.
पाच दिवशीय सोवळे व्रत आजपासून
शिरगाव या गावाबरोबरच आजूबाजूच्या परिसरामध्ये जत्रोत्सवाची तयारी यापूर्वीच सुरू झाली होती. व्रतस्थ धोंडगणांनी गुढीपाडव्या पासून शाकाहार पाळण्यास सुरूवात केला. तर आत जत्रोत्सवाच्या पाच दिवस पूर्वी हे धोंडगण लोकवस्तीपासून दूर पवित्र ठिकाणी वास्तव्य करून राहणार आहेत. पाच दिवस सोवळे व्रत पाळणारे धोंडगण आज गुरू. दि. 20 एप्रिल पासून तर तर तीन दिवस व्रत पाळणारे धोंडगण शनि. दि. 22एप्रिल पासून पवित्र ठिकाणी वास्तव्यात राहणार आहेत.
धोंडगण साफसफाई करण्यात मग्न
या पवित्र अशा सोवळे व्रतासाठी सर्व धोंडगण आपापल्या ठरलेल्या ठिकाणी वास्तव्य करणार असल्याने त्यांच्यातील उत्साहाला उधाण आले आहे. आपापल्या जागांची सध्या हे धोंडगण साफसफाई करून घेत आहेत. तसेच विशेष मंडप उभारणी व इतर तयारीला वेग आलेला आहे. आज गुरूवारपासून धोंडगणांच्या जागा गजबजणार आहेत. तर शनिवारपासून सर्व धोंडगण सोवळे व्रतात रूजू होणार असल्याने धोंडगणांच्या सर्व जागा धोंडगणांनी फुल्ल होणार आहेत. या पवित्र जागांवर अखंडीतपणे जत्रोत्सवापर्यंत देवीचा जयघोष आणि नामस्मरण चालणार आहे.
शिरगावातही जत्रोत्सवाच्या तयारीला वेग
शिरगाव गावातही जत्रोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. मंदिरावर विशेष रंगरंगोटी व विद्यूत रोषणाई आतापासूनच करण्यात येत आहे. पाच दिवशीय या जत्रोत्सवात शिरगावातील रस्त्यांच्या दुतर्फा थाटण्यात येण्राया फेरीवाल्यांनी आपली दुकाने थाटण्यास प्रारंभ केला आहे. गावातील घरांवर रंगरंगोटी व विद्यूत रोषणाईच्या कामाला जोर आला आहे.
होमकुंडाचीसाठी लाकडे येण्याब प्रारंभ
या जत्रोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेले देवी लईराईच्या भव्य अशा होमकुंडाची तयारीही सुरू झालेली आहे. होमकुंडस्थळी लाकडे येण्यास सुरू झालेली आहे. मयेतील कावळेरान येथून देवीच्या होमकुंडासाठी लागणारी लाकडे उपलब्ध केली जातात. या कावळेरान येथे खास जागा या लाकडांसाठी ठेवण्यात आली आहे. तेथून लाकडे आणली जातात. हि सर्व लाकडे नंतर या गावातील होमखंडी समाजातील लोकांकडून रचून भव्य असे होमकुंड तयार केले जाते. या होमकुंडाची तयारीही सुरू झालेली आहे.









