शहर म. ए. समितीच्या बैठकीत निर्धार
बेळगाव : महाराष्ट्र सरकारवर दबाव आणण्यासाठी व सीमाप्रश्नाची सोडवणूक लवकर व्हावी, या उद्देशाने मंगळवार दि. 28 रोजी मुंबई येथे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी धरणे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार असून हे आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार शहर म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आला. रंगुबाई भोसले पॅलेस येथे रविवारी झालेल्या बैठकीत आंदोलनासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. आंदोलनासाठी जाणाऱ्या सीमाबांधवांची नावनोंदणी शहर म. ए. समिती, तालुका म. ए. समिती, युवा समितीकडे केली जात आहे. यासंदर्भात विभागवार जागृतीही केली जात आहे. जे मराठी भाषिक दुचाकी, चारचाकींनी मुंबई येथे जाणार आहेत, त्यांनी आपल्या वाहनांचे क्रमांक व नावे म. ए. समितीकडे द्यावीत, असे आवाहन करण्यात आले.
उमेदवारांची नावे लवकर जाहीर करा
राष्ट्रीय पक्षांचे इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून प्रचारात उतरले आहेत. परंतु, म. ए. समितीने अद्याप उमेदवार निश्चिती न केल्यामुळे अथवा अर्ज स्वीकारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात न केल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. यावर बोलताना मालोजी अष्टेकर म्हणाले, योग्य वेळी समितीच्या कमिटीकडून उमेदवारांची नावे जाहीर केली जातील. त्यापूर्वी समितीचे काम घरोघरी पोहोचविण्यासाठी कार्य करावे, असे त्यांनी सांगितले. शहर म. ए. समितीची व्याप्ती वाढविण्यासाठी नवीन कार्यकर्ते घेतले जात आहेत. अद्यापही ज्या कार्यकर्त्यांनी नावनोंदणी केलेली नाही, त्यांनी लवकर नावनोंदणी शहर म. ए. समितीकडे करावी. यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, प्रकाश मरगाळे, अमर येळ्ळूरकर, अंकुश केसरकर, श्रीकांत कदम, गजानन पाटील, मदन बामणे, सचिन केळवेकर, अभिजीत मजुकर, चंद्रकांत कोंडुसकर, रमाकांत कोंडुसकर, साईनाथ शिरोडकर, सागर पाटील, अमित देसाई, महादेव पाटील यासह इतर उपस्थित होते.









