सावंतवाडी प्रतिनिधी
खासदार विनायक राऊत यांनी दहा वर्षात काय विकासकाम केले असा प्रश्न राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर विचारत आहेत. खरंतर त्यांनी या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आता मंत्री असताना काहीच केले नाही . फक्त लोकांची दिशाभूल करण्याचे काम आतापर्यंत केसरकरांनी केले. गावागावात प्रचाराला फिरण्यासाठी काहीच मुद्दे नसल्यामुळे त्यांनी व्हॅनिटी व्हॅन प्रचारात दाखल केली खरी पण एक दिवस तरी ते कुठे गावात जाऊन या व्हॅनिटी व्हॅन मध्ये झोपलेत का हे सांगावे . की ,आपल्या निवासस्थानाच्या समोर व्हॅनिटी व्हॅन लावून तेथे ते झोपतात का असा सवाल ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ ,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी ,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर आणि भीमशक्तीचे किशोर जाधव आदींनी संयुक्त पत्रकार परिषदेत केला.
खरंतर श्री केसरकर हे आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत. खरंतर श्री केसरकर यांनी जनतेला सांगावे की पंधरा वर्षांपूर्वी हेच श्री राणे हे केसरकरांसाठी दहशतवादी होते. या दहशतवादाच्या मुद्द्यावरच श्री केसरकर यांनी निवडणूक जिंकल्या . स्वतःच्या स्वार्थापोटी आणि राजकीय फायद्यासाठी श्री केसरकर यांनी श्री राणे यांच्याबाबत वाद निर्माण केले . मात्र, त्यांचे वाद कधीच नव्हते. फक्त जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत होते . हे आता त्यांच्या वागण्यातून सिद्ध झाले आहे. श्री केसरकर हे पालकमंत्री होते , मग आजपर्यंत विकास का झाला नाही ? खासदार विनायक राऊत हे मंत्री नसतानाही या भागाच्या विकासासाठी नेहमी झटत आहेत. अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देत आहेत. केसरकर फक्त घोषणाबाजी आणि लोकांची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत . त्यामुळे त्यांच्या या अशा खोट्या वागण्याला जनता भुलणार नाही जनता आता मतपेटीतून धडा शिकवेल . सावंतवाडी शहराचे नुकसान श्री केसरकर आणि राणे वादामुळेच झाले . हायवे सावंतवाडीच्या बाहेरून गेला, रेल्वे टर्मिनस रखडले . केसरकर आणि श्री राणे असे वाद निर्माण करून सावंतवाडी तालुक्याचा आणि शहराच्या विकासाला खीळ बसली याला जबाबदार केसरकरच आहेत असा घणाघात रुपेश राऊळ यांनी यावेळी केला . खासदार विनायक राऊत हे निश्चितच या मतदारसंघातून भरघोस मतांनी विजयी होणार आहेत असे ते म्हणाले .यावेळी किसन पवार, श्री परब, शैलेश गवंडळकर , श्री ठाकूर आदी उपस्थित होते.