खानापूर म. ए. समितीचा निर्णय : बैठकीत मान्यवरांनी मांडले विचार : गावागावांत पत्रके वाटून जागृती

प्रतिनिधी /खानापूर
खानापूर तालुका म. ए. समितीच्यावतीने 1 नोव्हेंबर काळा दिन गांभीर्याने पाळून शिवस्मारक येथे सकाळी 10 ते 4 धरणे आंदोलन करण्याचा निर्णय म. ए. समितीच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दिगंबर पाटील होते. बैठकीनंतर शहरात काळय़ादिनासंदर्भात पत्रके वितरित करण्यात आली.
प्रास्ताविक आबासाहेब दळवी यांनी करून बैठकीचा उद्देश व समितीच्या पुढील वाटचालीसंदर्भात घेण्यात येणाऱया निर्णयाबद्दल विचार मांडण्यात यावे, अशी सूचना केली. यावेळी प्रकाश चव्हाण म्हणाले, समितीच्या जागृतीसाठी पुढील काळात गावोगावी फिरुन समितीची जागृती करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. बाळासाहेब शेलार म्हणाले, समिती ही चळवळीच्या माध्यमातून उभारलेली संघटना आहे. चळवळीचे ध्येय सीमाप्रश्न सोडवून घेणे आहे. यासाठी सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीचा पाठपुरावा करण्यात यावा, तसेच कार्यकर्त्यांनी चळवळीपासून दूर जावू नये. अर्जुन देसाई म्हणाले, विरोधी गट अप्प्रचार करून आमच्याबाद्दल गैरसमज पसरवित आहे. यासाठी आपण सर्वांनी जबाबदारीने वाटचाल करणे गरजेचे आहे. नारायण कापोलकर म्हणाले, समितीच्या पदाधिकाऱयांबद्दल तालुक्यात वेगवेगळय़ा माध्यमातून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी समिती कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱयांनी कोणत्याही राष्ट्रीय पक्षाच्या संपर्कात राहू नये, तसेच पुढील काळात याबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे. मुरलीधर पाटील म्हणाले, आपल्यातलेच लोक व्यक्तीप्रेमापोटी दिगंबर पाटलांच्या नेतृत्वाखालील समितीची बदनामी करण्यात धन्यता मानत आहेत. मात्र आम्ही लोकांपर्यंत पालखीच्या माध्यमातून जाऊन आपली भूमिका स्पष्ट करुया, आणि समितीसाठी एकजुटीने काम करुया. यशवंत बिर्जे म्हणाले, आज समितीबद्दल अप्प्रचार करून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी आम्ही जशास तसे उत्तर देवून आपली भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे. पुढील काळात समिती कार्यकर्त्यांना एका झेंडय़ाखाली आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील.
यावेळी महादेव घाडी, पुंडलिक चव्हाण, नारायण लाड, मऱयाप्पा पाटील, यशवंत पाटील, विठ्ठल गुरव, ब्रम्हानंद पाटील, प्रवीण पाटील, शामराव पाटील, प्रल्हाद मादार, ईश्वर बोबाटे, शिवाजी पाटील आदींसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.









