खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक
खानापूर : बेळगाव येथे सोमवार दि. 4 डिसेंबर रोजी होणारा महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला. या मेळाव्यासाठी तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होण्यासाठी बुधवारपासून जागृती अभियान सुरू करण्याचे खानापूर तालुका म. ए. समितीच्या सोमवारी शिवस्मारक येथे झालेल्या बैठकीत ठरवण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई होते. सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी प्रास्ताविक करून बैठकीचा उद्देश सांगितला.
बेळगाव येथे कर्नाटक सरकारच्या होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात मराठी बाणा दाखवण्यासाठी सोमवार दि. 4 रोजी मध्यवर्ती समितीच्यावतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला खानापूर समितीने पाठिंबा व्यक्त केला असून या मेळाव्यासाठी तालुक्यातून हजारो समिती कार्यकर्ते सहभागी होण्याचा यावेळी निर्धार व्यक्त करण्यात आला. यासाठी तालुक्यात जागृती करून मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात येणार आहे. या बैठकीत मार्गदर्शन करताना माजी आमदार दिगंबर पाटील म्हणाले, कर्नाटक सरकार जाणीवपूर्वक मराठीचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी मेळाव्यातून आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी तालुक्यातील मराठी भाषिक आणि समितीप्रेमी नगारिकांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे ते म्हणाले.
पांडुरंग सावंत म्हणाले, तालुक्यातील सर्वसामान्यांच्या समस्यांना वाच्या फोडण्यासाठी समितीने आता अग्रेसर झाले पाहिजे. यासाठी तालुक्यातील समस्यांच्या निवारण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करण्यासाठी नियोजन करण्यात यावे. मुरलीधर पाटील यांनी मध्यवर्ती समितीच्या बैठकीतील वृत्तांत सांगितला. तसेच मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. या बैठकीत प्रकाश चव्हाण, बाळाराम शेलार, गोपाळ पाटील व अन्य मान्यवरांची भाषणे झाली. या बैठकीत तालुक्यातील हेम्माडगा, चोर्ला, रामनगर रस्त्यासंदर्भात तसेच तालुक्यातील वीट व्यवसायासाठी लागणाऱ्या मातीच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे त्या निर्णयाविरोधात आवाज उठविण्याचे ठरविण्यात आले. बैठकीला समिती कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.









