आटपाडी / सूरज मुल्ला :
आटपाडी तालुक्यातील पूर्वीच्या सर्वच जिल्हा परिषद गटाची तोडफोड करून चार गट नव्याने निर्माण झाले आहेत. फेररचनेनंतर आकारास आलेल्या चार जिल्हा परिषद गटातील भौगोलिक, राजकीय, सामाजिक, जातीय समिकरणांची नव्याने बेरीज राजकीय नेत्यांना करावी लागणार आहे. नव्या निर्मितीनंतर गट आगामी निवडणुकीसाठी पडळकर-देशमुख-पाटील गटाचा ‘कस’ लागणार आहे.
आटपाडी नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर आटपाडी जिल्हा परिषद गट रद्द झाला. त्यामध्ये आटपाडी, भिंगेवाडी व मापटेमळा या तीन गावांचा समावेश झाला. तर तत्कालीन आटपाडी गटातील नऊ गावे फेररचनेत कोठे जाणार? याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. आटपाडी तालुक्यात पूर्वीप्रमाणे चार जिल्हा परिषद गट अस्तित्वात आले आहेत. परंतु चारही गटाची रचना अनेक प्रश्न उपस्थिती होतील? अशीच आहे.
पूर्वीच्या आटपाडी जिल्हा परिषदेतील गटातील नऊ गावे दिघंची व करगणी या जिल्हा परिषद गटात समाविष्ट करण्यात आली आहेत. पूर्वीच्या दिघंची, करगणी, खरसुंडी या तीन जिल्हा परिषद गटातील गावे फोडून निंबवडे जिल्हा परिषद गटाची निर्मिती फेररचनेत झाली आहे. पूर्वीच्या करगणी जिल्हा परिषद गटातील काही गावे आताच्या खरसुंडी जिल्हा परिषद गटात आहेत.
फेररचनेनंतर अस्तित्वात आलेल्या चारही जिल्हा परिषद गटातील गावांची भौगोलिक सलगता काही ठिकाणी अनेकांना पचनी पडलेली नसल्याचे चित्र आहे. २०१७ च्या जिल्हा परिषद गटातील सलगता आता फेररचनेमुळे वेगळ्या स्वरूपात जिल्हा परिषद गटांमध्ये पहायला मिळत आहे. तिच स्थिती पंचायत समिती गणामध्येही पहायला मिळत आहे.
गत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपच्या झेंड्याखाली देशमुख व पडळकर गटाने एकहाती वर्चस्व मिळविले होते. काँग्रेस व राष्ट्रवादीने प्रत्येकी एक पंचायत समितीची जागा जिंकली होती. तर शिवसेनेने भाजपच्या संयुक्त शक्तीला कडवी झुंज दिली होती. त्या निवडणुकीनंतर आटपाडी तालुक्याच्या राजकीय पटलावर अनेक स्थित्यंतरे झाली आहेत.
भाजपच्या देशमुख व पडळकर गटात उभी फूट पडली आहे. गत जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेसोबत असणारी आटपाडीतील स्वाभिमानी आघाडी आता सेनेपासून दूर राष्ट्रवादी पक्षातही विभागणी झाली आहे. या सर्वांमुळे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे चित्र नवीन गट रचनेनंतर सर्वांनाच सोपे दूर आहे. जाईल, अशी सद्यस्थिती नाही.
आ. सुहास बाबर, जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांना फेररचनेनंतर अस्तित्वात आलेल्या जिल्हा परिषद गटात शिवसेनेचा झेंडा फडकविण्यासाठी कष्ट घ्यावे लागणार आहेत. आ.गोपीचंद पडळकर, माजी सभापती ब्रम्हनंद पडळकर यांना भाजपचे एकहाती वर्चस्व व देशमुख गट दूर गेल्यानंतरचा आपला करिष्मा दाखवून द्यावा लागणार आहे.
या सर्वांमध्ये देशमुख गटाची भूमिका मात्र कशाप्रकारे येणाऱ्या कालावधीत समोर येणार? याचे गुढ मात्र कायम आहे. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. तर त्यांचे बंधु माजी जि.प.अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी आपण भाजपमध्येच असल्याचे जाहीर केले आहे. परिणामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी व भाजपपेक्षा ‘देशमुख गट’ म्हणून ‘वाड्या’चे अस्तित्व पुन्हा निर्माण करण्याचे आव्हान असणार आहे.
नव्या जिल्हा परिषद गट रचनेनंतर तुतारीपासून फारकत घेतलेले भारत पाटील, काँग्रेसचे जयदीप भोसले, राष्ट्रवादीचे विनायक मासाळ, हणमंतराव देशमुख ही मंडळी कोणासोबत जाणार? मोर्चेबांधणी कशी करणार? हे देखील येणाऱ्या कालावधीत लक्षवेधी ठरणार आहे. असे असलेतरी आटपाडी तालुक्यातील राजकीय वाटचाल देशमुख-पाटील-पडळकर या तीन प्रमुख गटांभोवतीच निर्णायक ठरणार आहे.
फेररचनेनंतर अस्तित्वात आलेल्या गटात राजकीय गोळाबेरीज करणे शक्य असलेतरी आव्हानात्मकच ठरणार आहे. तालुक्याच्या राजकारणात आपले वर्चस्व सिध्द करण्यासाठी माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख, अमरसिंह देशमुख, आ. गोपीचंद पडळकर, ब्रम्हानंद पडळकर, आ. सुहास बाबर, तानाजी पाटील या तीन प्रमुख जोडींना कष्टच घ्यावे लागणार आहेत. नवे जि.प.गट व पं.स.चे गण यात आपला झेंडा नव्याने फडकविण्यासाठी राजकीय नेते, इच्छुकांनी आतापासूनच बेरजेला गती दिली आहे. त्याअनुषंगाने हरकतींची मुदत संपल्यानंतर गती येणार आहे.
- नवीन जिल्हा परिषद गट
दिघंची-विठलापुर, राजेवाडी, लिंगीवरे, पळसखेल, आवळाई, कौठुळी, उंबरगाव, पुजारवाडी दि.
करगणी-माडगुळे पिंपरी खुर्द, आंबेवाडी, बोंबेवाडी, देशमुखवाडी, खांजोडवाडी, यपावाडी, पुजारवाडी आ, मासाळवाडी, माडगुळे, लेंगरेवाडी, तडवळे, शेटफळे, माळेवाडी, पात्रेवाडी.
निंबवडे-घरनिकी, विभूतवाडी, कुरूंदवाडी, झरे, पिंपरी बुद्रुक, पारेकरवाडी, पडळकरवाडी, जांभुळणी, मुढेवाडी, गळवेवाडी, वाक्षेवाडी, कामथ, बाळेवाडी, बनपुरी, शेंडगेवाडी.
खरसुंडी-नेलकरंजी, गोमेवाडी, तळेवाडी, काळेवाडी, हिवतड, मानेवाडी, घाणंद, वलवण, चिंचाळे, धावडवाडी, औटेवाडी, कानकात्रेवाडी, मिटकी.








