कुडाळ :
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर तसेच देवेंद्र पिळणकर यांच्यावर हद्दपारीची केलेली कारवाई ही राजकीय सूडातून प्रेरित आहे. सत्ताधारी पक्षाकडून विरोधी पक्षांना राजकीयदृष्ट्या संपविण्यासाठी असले उपद्व्याप प्रशासनाला हाताशी धरुन केले जात आहेत. अशाप्रकारच्या सूडभावनेच्या व दबावाच्या कारवायांमुळे विरोधी पक्ष दबणार नाहीत, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
हद्दपारी प्रस्तावामध्ये सत्ताधारी पक्षांशी संबंधित असलेल्या व्यक्तींना अभय का?, असा सवाल त्यांनी करून आमचा पक्ष आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभा राहणार आहे. पिळणकर यांच्यावरील हद्दपारीच्या कारवाई विरोधात सक्षम न्यायालयात आम्ही दाद मागणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
आतापर्यंत ईडी, सीबीआय यासारख्या यंत्रणांचा वापर करून वजनदार नेत्यांना त्रास दिला जात होता. आता पोलीस व महसूल यंत्रणेला हाताशी धरुन स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वेठीस धरून विरोधी पक्ष शिल्लकच ठेवायचा नाही. देशात, राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात व सर्व विभागांवर फक्त आणि फक्त आपलीच हूकुमशाही प्रस्थापित करण्यासाठीच हे उपद्व्याप सत्ताधारी पक्षाकडून सुरू आहेत, असा आरोप सामंत यांनी केला आहे.
- ‘त्यां’ना अभय का?
सत्ताधारी पक्षाने एक लक्षात ठेवावे, सत्ता ही कुणालाही अजरामर नाही. सत्ता ही संगीत खुर्चीचा खेळ आहे. आज जे सुपात आहेत, ते कधीतरी जात्यात जाणार आणि भरडले जाणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात असे अनेक हद्दपारीचे प्रस्ताव पोलिसांकडून प्रांताधिकारी यांच्याकडे प्रस्तावित केले आहेत. त्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेल्या सत्ताधारी पक्षांच्या पण व्यक्ती आहेत. त्यांना अभय का?, याची संपूर्ण माहिती आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार आहोत.
- पोलीस–महसूलला हाताशी धरुन विरोधी पक्ष संपविण्याचा प्रयत्न
कणकवली पोलीस निरीक्षक जगताप हे सत्ताधारी पक्षाच्या दबावामुळेच सत्ताधारी पक्षाच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना संरक्षण देत आहेत. विरोधी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर विनाकारण राजकीय हेतूने कणकवली पोलीस निरीक्षक व कणकवली प्रांत यांच्यामार्फत कारवाईचा बडगा उचलला जात आहे. सत्ताधारी पक्षाने पोलीस व महसूल यंत्रणेला हाताशी धरुन विरोधी पक्ष संपविण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते असल्या कारवायांना भीक घालणार नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या पाठिशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा राहून अशा राजकीय प्रेरित घटनांच्या विरोधात लढा देऊ. मात्र, हार पत्करणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
- कारवाईविरोधात सक्षम न्यायालयात दाद मागणार
अनंत पिळणकर व देवेंद्र पिळणकर यांच्यावरील हद्दपारीच्या कारवाई विरोधात सक्षम न्यायालयात आम्ही दाद मागणार असून पिळणकर यांना सर्वतोपरी सहकार्य पक्षाच्या माध्यमातून केले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
- हद्दपारीच्या प्रस्तावांची यादी नावांसह जाहीर करावी!
तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस व महसूल प्रशासनाने आतापर्यंत प्रस्तावित केलेल्या हद्दपारीच्या प्रस्तावांचा लेखाजोखा न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात असे किती हद्दपारीचे प्रस्ताव तयार करून प्रस्तावित केले?, त्यातील किती प्रस्ताव मंजूर केले?, किती नामंजूर केले आणि प्रलंबित किती आहेत?, याची यादी नावांसह जाहीर करावी, असे आव्हानही सामंत यांनी दिले आहे.








