प्रशांत चव्हाण / देहू
जाता पंढरीशी सुख वाटे जीवा ।
आनंद केशवा । भेटताचि ।।
असा उत्कट भाव…टाळ मृदंगाचा अखंड गजर…विणेचा झंकार…ज्ञानोबा-तुकोबा नामाचा जयघोष…अन् विठुरायाच्या भेटीची आस…अशा भारलेल्या वातावरणात व भक्तीच्या वर्षावात लाखो वैष्णवांच्या साक्षीने संत तुकाराम महाराजांच्या पालखीने बुधवारी दुपारी चारच्या सुमारास देहूहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.
संत तुकाराम महाराजांच्या 340 व्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी पुण्यभूमी देहूत जणू भक्तीचा महापूरच लोटला होता. प्रस्थानाचा हा सोहळा ‘याची देही याची डोळा’ अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातील लाखो भाविक इंद्रायणीकाठी एकवटले होते. मुख्य मंदिरातील फुलांची आकर्षक सजावट मन मोहवून टाकत होती. पावसाच्या सरी आणि अभंगाचा ताल…यावर ठेका धरत वारकऱ्यांनी या सोहळ्यात रंग भरले.
बुधवारी भल्या पहाटे घंटानादाने देहू गाव जागा झाला. पहाटे साडेचार वाजता काकड आरती झाली नि अवघे वातावरण भारून गेले. पाच वाजता श्री विठ्ठल ऊक्मिणी मंदिरात संस्थानच्यावतीने महापूजा झाली. तर साडेपाच वाजता संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे, विश्वस्त विक्रमसिंह महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, वैभव महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा झाली. त्यानंतर वैकुंठस्थान येथील संत तुकाराम महाराज मंदिरातील पूजाविधी पार पडले. सकाळी सहा वाजता पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात विश्वस्तांच्या हस्ते पूजा झाली. सकाळी दहा ते बारा या वेळेत देहूकर महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्याने वातावरण भक्तिमय होऊन गेले. दुपारी बारा ते दोन या वेळेत महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला.
दुपारी दोनच्या सुमारास इनामदारवाड्यातून संत तुकाराम महाराजांच्या पादुका वाजतगाजत मुख्य देऊळवाड्यात आणण्यात आल्या. त्यानंतर पालखी प्रस्थान सोहळ्यास दुपारी अडीच वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सुऊवात झाली. अकलूज येथील मोहिते-पाटील व बाभूळगावकर यांच्या अश्वांनी महाद्वारातून प्रवेश करताच भाविकांचे हात जोडले गेले. मानाच्या दिंड्या देऊळवाड्यात पोहोचताच सोहळ्यातील वातावरण भारले. फडकरी, मानकरी, दिंडीप्रमुख यांचा संस्थानतर्फे सत्कार करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तसेच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार श्रीरंग बारणे, राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, सुनील शेळके, उमा खापरे, अमित गोरखे, शंकर मांडेकर, अश्विनी जगताप यांच्या उपस्थितीत पादुकांची पूजा करण्यात आली. फुलांनी सजविलेल्या पालखीमध्ये पादुका ठेवण्यात आल्या. तसा सारा सोहळाच तेजोमय होऊन गेला. वातावरण भारावले. चारच्या सुमारास पालखी खांद्यावर उचलून भजनी मंडपातून बाहेर आणताच वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आले. टाळ-मृदंगाचा स्वर टीपेला पोहोचला. पुंडलिक वरदा…हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम…असा जयघोष झाला. शंख, नगाऱ्याच्या गजराने देहुनगरी दुमदुमून गेली. वारकरी फुगड्यात दंगले. देहभान विसरून नाचू, डौलू लागले. देऊळवाड्यातील पिंपळवृक्षाची पानेही जणू या सुरांशी समरस होत सळसळू लागली. वऊणराजानेही हलकासा जलाभिषेक केला. इंद्रायणीच्या डोहात आनंदाचे तरंग उमटले. सारा आसमंतच या सोहळ्यात रंगून गेला. मंदिर प्रदक्षिणेनंतर पालखी सोहळा सायंकाळी इनामदार वाड्यात मुक्कामी पोहोचला. त्या ा†ठकाणी समाजआरती झाली. रात्रभर अवघी देहुनगरी भजन कीर्तनात रंगली. गुऊवारी सकाळी सोहळा आकुर्डीकडे मार्गस्थ होणार आहे. येथील ा†वठ्ठल मां†दरात पालखीचा मुक्काम असेल.
पालखीचा आज आकुर्डीत मुक्काम
संत तुकाराम महाराजांची पालखी गुऊवारी इनामदारवाड्यातून आकुर्डीकडे मार्गस्थ होईल. पहिला विसावा अनगडशाह बाबा दर्गा येथे असेल. तेथे अभंग, आरती होईल. तसेच चिंचोली पादुका येथे अभंग, आरती होईल. निगडीत दुपारी भोजन करून पालखी सोहळा रात्री आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्काम करणार आहे.








